KCR आमदार-खासदारांना घेऊन महाराष्ट्रात, कुणाला देणार धक्का?

मंगळवार, 27 जून 2023 (10:21 IST)
मयुरेश कोण्णूर
facebook
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) त्यांच्या 'भारत राष्ट्र समिती' (बीआरएस)चं मंत्रिमंडळ, आमदार, खासदार असा मोठा ताफा घेऊन पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला रस्त्यामार्गे प्रवास करत आले आहेत.
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रथेप्रमाणे पाऊसकाळ चांगला यावा म्हणून आषाढी एकादशीला विठ्ठलाला साकडं घालतील, पण तेलंगणाचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच सीमोल्लंघन करत पांडुरंगाला राजकीय साकडं घालण्याच्या पावित्र्यात आहेत.
 
केसीआर यांच्या महाराष्ट्रप्रवेश आता राज्यामध्ये मोठा गंभीर राजकीय विषय झाला आहे. सुरुवातीला तेलंगणासीमेनजीक काही गावांमध्ये, ज्यातली बरीचशी तेलुगुभाषिक आहेत, त्यांच्यावर प्रभावापुरतं हे राव यांचं राजकीय एडव्हेंचर असेल असं वाटलं होतं. पण ते आता सीमावर्ती भाग सोडून महाराष्ट्रभरात जात आहेत असं दिसतंय.
 
मुंबईपासून महाराष्ट्राच्या सगळ्या शहरांत, महामार्गांवर 'अब की बार किसान सरकार' अशी मोठमोठी होर्डिंग्स लागली आहेत. केसीआर यांचे फोटो प्रामुख्यानं लावले जात आहेत आणि त्या पोस्टर्सवर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेही फोटो लावले आहेत.
 
गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्रातल्या सर्वभाषिक वृत्तपत्रांमध्ये तेलंगणा सरकारच्या जाहिराती जवळपास रोज येत आहेत. मराठी टेलिव्हिजन वाहिन्यांवरही त्यांच्या जाहिराती सातत्यानं काही महिन्यांपासून सुरु आहेत.
 
सतत महाराष्ट्रात बीआरएस तर्फे कार्यक्रम केले जात आहेत. केसीआर यांनी नांदेडपासून सुरुवात केली, पण नंतर छत्रपती संभाजीनगरमध्येही मोठी सभा घेतली. नागपूरमध्ये त्यांनी पक्षानं नवं कार्यालय सुरु केलं आणि त्यासाठी केसीआर स्वत: आले.
 
गेल्या महिन्याभरात या पक्षानं महाराष्ट्रात मोठी भरती मोहिमही उघडली आहे. सगळ्यांना पक्षाचे दरवाजे उघड केले आहेत. त्यांना हैद्राबादला चर्चेसाठी बोलावण्यासाठी अक्षरश: खाजगी विमानं पाठवली जात आहेत. आणि मुख्य म्हणजे अनेक स्थानिक नेते त्यांच्या गळालाही लागत आहेत.
 
त्यात नुकतंच आलेलं नाव म्हणजे भगिरथ भालके. पंढरपूरचे राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालकेंचे हे पुत्र. त्यांना पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीनं तिकिटही दिलं होतं, पण ते हरले. आता बीआरएस मध्ये ते गेले आहेत.
 
मराठवाड्यातले, बहुतांश कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतले, अनेक नेते जे अनेक वर्षांपासून संधीची वाट पाहत आहेत, ते बीआरएस कडे जाणारा रस्ता पकडत आहेत. याच्या परिणमाची जाणीव या पक्षांच्या नेत्यांना झाल्यावाचून राहिली नाही.
 
गेल्या आठवड्यात 'राष्ट्रवादी कॉंग्रेस'च्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी जाहीरपणे केसीआर यांच्या 'बीआरएस' पक्षाला हलक्यात न घेण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांनी 2019 मधल्या 'वंचित बहुजन आघाडी'च्या परिणामाची आठवणही करुन दिली. 'वंचित'नं मत घेतल्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्य अनेक जागा लोकसभा आणि विधानसभेला छोट्या फरकानं हातातनं निसटल्या होत्या.
 
आणि आता तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचरणी आपलं आख्खं मंत्रिमंडळ आणून आपला पक्ष महाराष्ट्राच्या परंपरेशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. सहाजिक आहे की त्यांना स्वत:च्या पक्षाविषयी अधिक चर्चा इथं व्हायला हवी आहे. पण केसीआर यांना महाराष्ट्रात नेमकं करायचं काय आहे?
 
'केसीआर' यांना नेमकं काय करायचंय?
'बीआरएस' पक्ष महाराष्ट्र्रात हातपाय का पसरतो आहे, हा मोठा कळीचा आणि औत्सुक्याचा विषय राज्याच्या राजकारणात बनला आहे. आंध्र प्रदेशचं विलगीकरण झाल्यापासून जन्माला आलेल्या तेलंगणात पहिल्या दिवसापासून त्यांचं राज्य आहे.
 
एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा प्रांत, पण तेलंगणा स्वतंत्र व्हावा म्हणून हयात घालवलेल्या केसीआर यांना लढा यशस्वी होण्याचा राजकीय लाभ मिळाला आणि त्यांची स्थापनेपासून कायम सत्ता इथे राहिली.
 
पण आता पर्यंत आंध्र-तेलंगणाची सीमा न ओलांडलेल्या राव यांना गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले आणि त्यानंतर त्यांनी आपले मनसुबे जाहीर करायला सुरुवात केली. अगोदर त्यांनी पक्षाचं 'तेलंगणा राष्ट्र समिती' हे नाव बदलून 'भारत राष्ट्र समिती' हे ठेवलं आणि सीमोल्लंघनाचा हेतू जाहीर केला.
 
"केसीआर यांची राष्ट्रीय आकांक्षा लपून राहिली नाही आहे. त्यांना दिल्लीची स्वप्नं पडू लागली आहेत. त्यासाठीच त्यांनी देशभरातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटणं सुरु केलं. त्यांची इच्छा होती की ते सगळ्या भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणू शकतील. पण आता ती जागा नितीश कुमार यांनी घेतलेली आपण पाहतो आहोत. त्यामुळे केसीआर पाटण्याच्या बैठकीला गेले नाहीत. पण त्यांचा 'देवेगौडा इफेक्ट'वर विश्वास आहे. जसं मोजक्या खासदारांसह 'जेडीएस'चे एच डी देवेगौडा पंतप्रधान झाले, तसं विशिष्ट परिस्थितीत ही संधी आपल्यालाही मिळू शकते असं राव यांना वाटतं," असं 'बीबीसी तेलुगु'चे संपादक जी एस राममोहन सांगतात.
 
सहाजिक, सीमा ओलांडायचीच तर त्यांचं पहिलं लक्ष महाराष्ट्राकडे गेलं. इथे सीमेनजीक तेलुगु भाषिक मोठा समुदाय आहे. शिवाय तेलंगणात शेतकरी, दलित आणि मुस्लिम समुदायासाठी त्यांच्या योजनांची देशभर चर्चा होते. तेलंगणानजीकच्या मराठवाड्यात हे तीनही वर्ग मोठ्या संख्येनं असल्यानं बीआरएसला तिथं त्यांच्यासाठी सुपिक जमीन दिसली. इतिहासाचाही थोडा भाग त्यामध्ये आहे.
 
काही दिवसांपूर्वी केसीआर यांची महाराष्ट्रातली तिसरी सभा झाल्यावर मराठवाड्यातले ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव 'बीबीसी मराठी'शी म्हणाले होते की, "मराठवाडा आणि हैदराबाद संस्थान यांच्यात पूर्वीचा कनेक्ट तर आहेच. याशिवाय मराठवाडा आणि हैदराबादमध्ये मुस्लिम आणि दलित मतदार सारख्याच प्रमाणात आहेत. आधी ओवेसी यांचा MIM नांदेडमार्गे संभाजीनगरला आले. मग या पक्षाने इथे नगरसेवक, आमदार, खासदारही मिळवले. आता त्याच मार्गाने BRS येऊ पाहत आहे. पण MIM सोबत युती असताना BRS राज्यात का येत आहे हा प्रश्न आहे."
 
तसंच, भालेराव पुढे म्हणाले की, "BRS चा डोळा दलित मतांवर असू शकतो. राज्यात आंबेडकर, आठवले आणि काँग्रेस यांच्या दलित मतांमध्ये विभाजन करणे हा BRS चा अजेंडा असू शकतो. तेलंगणातील 'दलित बंधू' योजनेची ज्या प्रकारे जाहिरात केली जात आहे, त्यातुन केसीआर यांना दुसरे आंबेडकर असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे दलितांच्या मतावर काही प्रमाणात फरक पडू शकतो.
 
कॉंग्रेस, राष्ट्रवादीला धास्ती, भाजपाला फायदा?
'बीआरएस'च्या या नव्या प्रवेशानं महाराष्ट्राची समीकरणं कशी बदलतील, बिघडतील हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. त्याबद्दल एक कयास पहिल्यापासून लावला जातो आहे की या तोटा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला होईल. एक तर 'बीआरएस'चा प्रभाव पडू शकतो तो भाग या दोन पक्षांसाठी महत्वाचा आहे. शिवाय ज्या विविध गटांच्या, समाजांच्या मतदानावर त्यांचं लक्ष आहे ते महाराष्ट्रात कॉंग्रेस राष्ट्रवादीचे मतदार मानले जातात.
 
केसीआर यांची राजकीय दिशा ही हिंदुत्ववादी नाही. त्यामुळे या विचारधारेनं राजकारण करण्याच्या भाजपापेक्षा कॉंग्रेस राष्ट्रवादीचे मतदार त्यांच्याकडे झुकू शकतात, हा तर्क. शिवाय केसीआर जागा जिंकण्याइतपत मतं घेऊ शकले नाहीत, तरी ते जी मतं घेतील ती कॉंग्रेस-राष्ट्रवादी वा महाविकास आघाडीची जागा पडण्यास पुरेशी ठरतील अशी धास्ती या पक्षांना आहे.
 
त्यामुळेच अजित पवारांनी अगोदरच धोक्याची सूचना दिली आणि या पक्षांकडून भाजपा-बीआरएसचं संगनमत आहे असे आरोपही सुरु झाले आहेत.
 
"भाजपा आणि 'बीआरएस'मध्ये काही आतून ठरलं आहे का अशी चर्चा तेलंगणातही सुरु आहे. पण मला वाटतं की सध्या ती केवळ एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे. ते सिद्ध करण्यासाठी हातात काही नाही. हे झालं आहे की केसीआर यांची मुलगी कविता हिच्याविरुद्ध सुरु असलेली केंद्रीय यंत्रणांची चौकशी तूर्तास थंड आहे आणि तेलंगणातही भाजपाचा त्यांच्याविरुद्ध आक्रमकपणा कमी झाला आहे. पण त्यातून निश्चित सांगता येणार नाही. माझ्यामते राष्ट्रीय स्तरावर आपली दखल घेतली जावी यासाठी राव यांनी प्रयत्न सुरु केले आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्रात जाणं त्यांना योग्य वाटलं, असंच याकडे पाहता येईल," असं जी एस राममोहन म्हणतात.
 
ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांच्या मते, “काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची धाटणी ही गरीब आणि शेतकऱ्यांसाठी आहे. तर भाजपची मध्यमवर्गीय आणि उच्च-मध्यमवर्गीयांसाठी आहे. केसीआर शेतकरी आणि गरिबांविषयीच बोलत आहेत. त्यामुळे याचा परिणाम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर होऊ शकतो. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला याच लोकांमधून मतं मिळवायची आहेत.
 
“निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि BRS यांच्यात मतांचं विभाजन होऊन त्याचा प्रत्यक्षरित्या भाजपला फायदा होऊ शकतो.”
 
महाराष्ट्र्रात जर महाविकास आघाडी निवडणुकीपर्यंत प्रत्यक्षात राहिली तर 'बीआरएस'मुळे होणा-या मतविभाजनाचा फटका कोणाला बसेल हे पाहणं महत्वाचं ठरेल. 'आप' आणि 'तृणमूल कॉंग्रेस'मुळे गोव्यात तो कॉंग्रेसला बसला होता. 'आप'चा फटका कॉंग्रेसला गुजरात, पंजाब आणि दिल्लीमध्येही बसला होता. तसंच काहीसं 'बीआरएस'मुळे महाराष्ट्रातही होईल का?
 
केसीआर यांच्या जमेच्या बाजू
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात असलेल्या सीमेलगतच्या मराठवाड्यातल्या काही गावांनी तेलंगणामध्ये समाविष्ट होण्याची इच्छा जाहीररित्या व्यक्त केली होती. याचं कारण होतं ते केसीआर यांच्या सरकारतर्फे तेलंगणात राबवल्या जाणा-या अनेक योजना. विशेषत: शेतकरी आणि गरीब वर्गासाठी. त्याचं आकर्षण महाराष्ट्रातही आहे आणि तीच केसीआर यांची जमेची बाजू असेल.
 
26 मार्च रोजी केसीआर यांची राज्यातील दुसरी जाहीर सभा नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथं झाली होती. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी तेलंगणा मॉडेल काय आहे ते सांगितलं. त्यासाठी त्यांनी तेलंगणा सरकार शेतकऱ्यांसाठी, दलितांसाठी राबवत असलेल्या 6 योजनांचा उल्लेख केला.
 
शिवाय, तेलंगणा सरकारनं 2018-19 च्या खरिप हंगामापासून ‘रयतू बंधू’ योजना सुरू केली आहे.
 
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकरी 5-5 हजार रुपयांची मदत खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामावेळेस दिली जाते. पेरणीपूर्व खते, बियाणे, कीटनाशकांच्या खरेदीसाठी ही मदत दिली जाते.
 
केसीआर आणि त्यांच्या पक्षाच्या दावा आहे की त्यांचं हे तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात त्यांना जम बसवून देईल.
 
पण तेलंगणामध्ये 'बीआरएस'ची अवस्था काय आहे?
एकीकडे केसीआर आणि त्यांची मंत्रिमंडळ महाराष्ट्रात पंढरपूरची वारी करतं आहे आणि इथे पक्षविस्तार करण्याच्या प्रयत्ना आहे, पण त्याच वेळेस तिकडे तेलंगणामध्ये बीआरएस समोर पहिल्यांदाच मोठं आव्हान उभं राहिलं आहे. ते आव्हान कॉंग्रेसनं उभं केलं आहे.
 
केसीआर पंढपरपुरच्या वाटेवर असतांना त्यांच्या पक्षातल्या काही आजी-माजी खासदार-आमदारांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. येत्या काही दिवसांमध्ये तेलंगणात कॉंग्रेसमध्ये बरेच पक्षप्रवेश होणार आहेत अशा बातम्या आहेत.
 
आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहिण आणि 'वाय एस आर' तेलंगणा पार्टीच्या प्रमुख वाय एस शर्मिला या कॉंग्रेसमध्ये शामील होणार असल्याच्या बातम्या आहेत. येत्या नोव्हेंबर तेलंगणाची विधानसभा निवडणूक आहे आणि आतापर्यंत झालेले काही सर्व्हे तिथं कॉंग्रेस केसीआर यांना जोरदार लढत देईल असं चित्र आहे.
 
"तेलंगणात गेल्या काही वर्षांमध्ये भाजप जेवढा वाढेल असं वाटलं होतं,तेवढा वाढला नाही. 3-4 जिल्ह्यांपलिकडे त्याचं प्रभावक्षेत्र विस्तारलं नाही. पण काँग्रेसही हात-पाय गाळून होती. दिशाहीन होती,नेतृत्वहीनही होती. पण या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा तेलंगणात आली आणि तेलंगण काँग्रेसमध्ये काहीतरी हालचाल घडली.”
 
“रेवंथ रेड्डी नावाचा तरुण प्रदेशाध्यक्ष ठळकपणे पुढे आला. पाठोपाठ शेजारच्या कर्नाटकात पक्षाने खणखणीत यश मिळवलं. त्याचा तातडीचा परिणाम तेलंगणात दिसू लागला. पक्ष सोडून गेलेल्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतावं, असं जाहीर आवाहन प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डींनी केल्यानंतर खरोखरच भाजपमधून आणि बीआरएसमधून नेतेमंडळी काँग्रेसकडे परतू पाहत आहेत," राजकीय निरिक्षक सुहास कुलकर्णी यांनी नुकतंच त्यांच्या 'ब्लॉग'मध्ये लिहिलं आहे.
 
त्यामुळे प्रश्न हा आहे की तेलंगणात, स्वत:च्या घरामध्ये, आव्हान उभं राहिलेलं असतांना केसीआर महाराष्ट्रात किती लक्ष देऊ शकतील. "पण मला या दाव्यात काही तथ्य आहे असं सध्या वाटत नाही. खूप लवकर हा निष्कर्ष काढणं होईल. सध्या तर तेलंगणात केसीआर हा एकमेवर चेहरा आहेत आणि निवडणुका लांब आहेत," असं जी एस राममोहन म्हणतात.
 
तरीही एक नक्की की, केसीआर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र नवा रंग भरला आहे. त्यांचे मित्र कोण आणि शत्रू कोण हे नंतर समजेल. निवडणुका अजून दूर आहेत. पण सध्या तरी ते पंढरपूरला जाऊन, एका तीर्थक्षेत्रातून, काही राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती