अमित शहा देशाचे संरक्षणपंत्री होणार?

शनिवार, 29 जुलै 2017 (12:05 IST)
अमित शहा आणि स्मृती इराणी या दोघांनाही भाजपकडून गुजरातमधून राज्यसभेसाठी पाठवले जाणार आहे. गुजरातमध्ये भाजपचे जे वर्चस्व आहे ते पाहता या दोघांकडेही राज्यसभेची खासदारकी येणे निश्चित मानले जाते आहे.  देशभरात भाजपने लोकसभा, राज्यसभा निवडणूकीत मारलेली मुसंडी, भाजपने या मिळविलेल्या विजयाचे सुत्रधार भाजपाध्यक्ष अमित शहा हे आता नव्या इनिंगमध्ये दिसणार आहेत. अमित शहा हे सध्याच्या घडीला गुजरातच्या सरखेज विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. पण अमित शहांना आता खासदारकी देऊन त्यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाची धुरा दिली जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्यामुळे राजकीय वर्तुळात अमित शहांच्या खासदारकीची चर्चा चांगलीच रंगली आहे.
 
मनोहर पर्ऱिकर यांनी मार्च २०१७ मध्ये राजीनामा आपल्या संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते गोव्याच्या राजकारणात पुन्हा गेले. त्यानंतर संरक्षण मंत्री पद कोणाला मिळणार याची चर्चा रंगली होती. दरम्यानच्या काळात भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेले तणावपूर्ण संबंध टोकाला पोहचले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपला या पदासाठी एक खासदार हवा आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनतर सर्वात मोठ नाव म्हणून अमित शहांकडे पाहिले जाते. सध्या भारत-पाक मधील तणावाचे संबध, काश्मीर प्रश्न, चीन विरुद्धची भुमिका अशा विषयांसाठी भाजपला संरक्षणमंत्रीपदासाठी चांगल्या नेतृत्वाची गरज होती. ही परिस्थिती हाताळण्यासाठी एक ठाम निर्णय घेणाऱ्या संरक्षण मंत्र्याची देशाला गरज असल्यामुळेच अमित शहा यांना हे पद मिळू शकते अशी चर्चा रंगली आहे. आमच्यासाठी देशाची सुरक्षा ही सर्वात मोठी प्राथमिकता आहे असा संदेश या निर्णयातून मोदी सरकार जनतेपुढे ठेवू शकते असेही म्हटले जात आहे.
 
काही दिग्गज जाणकारांच्या मते अमित शहांना कॅबिनेटमध्ये आणले जाईल पण त्यांच्याकडे संरक्षण मंत्रीपद दिले जाईलच असे नाही. पण धक्कातंत्राने निर्णय घेण्यात आणि टायमिंग साधण्यात नरेंद्र मोदी हे प्रसिद्ध असल्यामुळे अमित शहांच्या खासदारकी मागे वेगळी गणिते असू शकतात अशा चर्चांनाही उधाण आले आहे.

वेबदुनिया वर वाचा