चीरा मीनू : साडीनेच पकडता येणाऱ्या माशाचा दर 3 ते 5 हजार रुपये किलो एवढा का?
गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (16:43 IST)
अगदी धाग्यासारखे दिसणारे लहान लहान मासे...पण यांचा दर किलोला तीन ते चार हजार इतका.
हे मासे आहेत चीरा मीनू. गोदावरी नदी आंध्र प्रदेशच्या बंगाल उपसागराला जिथे जाऊन मिळते, तिथे हे चीरा मीनू मासे आढळतात.
खासकरून हिवाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे दिवाळीच्या दोन-तीन आठवड्यांमध्ये हे मासे मिळतात. तेव्हा या माशांना खूप मागणी असते.
गोदावरी नदी जिथे समुद्राला मिळते, त्या खाडीच्या भागात यानम नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावात या माशांचा मोठा व्यापार होतो.
हे मासे इतके लहान असतात की त्यांना मच्छर दाणी किंवा साडीनेच पकडावं लागतं. हे मासे प्रचंड स्वादिष्ट आहेत. त्याला जगभरातून खूप मागणी असते. अगदी अमेरिकेतही याची निर्यात केली जाते.
यानम येथील रहिवासी सूर्यप्रकाश सांगतात की, “चीरा मीनू मासे वर्षातून एकदाच मिळतात. त्यामुळे लोक ते खरेदी करण्यासाठी यानम परिसरात गर्दी करतात. बहुतांश लोक हे मासे इथेच खाऊन संपवतात.”
हे मासे साड्यांनी पकडले जात असल्यामुळेच त्यांना 'चीरा मीनू' असं नाव पडलं आहे. ही पालीच्या जातीतली एक प्रजात आहे.
गोदावरीच्या खाडी परिसरात खारफुटीची जंगले मोठ्या प्रमाणात आहेत. खारफुटीमुळे या परिसरात ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हे मासे या भागात अंडी देतात.
पूर्वेकडून वारे वाहू लागले की या अंड्यांमधन बारीक बारीक मासे बाहेर पडतात. गोदावरीच्या प्रवाहात उलट्या दिशेने पोहून येणारे हे मासे पकडून त्यांची विक्री केली जाते.
यानमशिवाय डॉ. बी. आर आंबेडकर नगर, कोनासिमा आणि पूर्व गोदावरी जिल्ह्यातही आढळून येतात.
चीरा मीनू मासे जवळपास 3 हजार रुपये किलो दराने विकले जातात. कधी कधी भाव 5 हजार रुपये किलोपर्यंत जातो.
हे मासे किनाऱ्याजवळच जास्त प्रमाणात सापडतात. आतमध्ये खोल समुद्रात गेलं की यांचं प्रमाण कमी होत जातं.
चीरा मीनू मासे चवीला खूपच छान असतात. कच्चं चिंच घालून या माशाची रस्सा भाजी बनवली जाते. वर्षातून एकदाच येत असल्याने या माशांना मागणी खूप जास्त आहे.
पण हे मासे आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. त्यामुळे हे काहीसे महाग असतात. पण महाग असले तरी लोक ते आवडीने घेतात.
साधारपणपणे, मासे हे किलो-किलोच्या मापाने विकले जातात. पण चीरा मीनू हे मासे पारंपरिक मापानेच विकण्यात येतात.
तव्वा, सेरू, कुंजम आणि बिंदे इतक्या वजनाने ते विकण्यात येतात.
गेल्या वर्षीच्या हंगामात एक सेरू म्हणजेच जवळजवळ एक किलो मासे अडीच ते चार हजार रुपये किलोने विकले गेले.
यानम येथील SRK डिग्री कॉलेजमधील जैवशास्त्र विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखऱ यांना सांगितलं की, “चीरा मीनू हा स्थलांतर करणारा मासा आहे. साधारणपणे मासे त्यांच्या पिलांसाठी अन्न मिळवायला दुसरीकडे जातात. त्यासाठी काही प्रजाती अशा प्रकारे स्थलांतर करतात.”
चीरा मीनू प्रजातीतील एका प्रौढ माशाची लांबी 25 ते 75 सेंटीमीटरपर्यंत वाढतो. भरपूर अन्न असल्यामुळे ते अशा प्रकारच्या ठिकाणी येतात.
हे मासे अगदी लहान असतानाच त्यांना पकडलं जातं.
डॉ. चंद्रशेखर सांगतात, “चीरा मीनू माशांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असतं. त्यामुळे आहारात त्याचा समावेश केल्यास शरीराला फायदा होतो.
ते पुढे सांगतात, “आपण माशांच्या मधील काटा काढून टाकतो. पण चीरा मीनू अख्खा खाल्ला जातो. त्यामुळे त्यातून आपल्याला भरपूर कॅल्शियम मिळतं. विशेषतः स्तनपान देणाऱ्या मातांसाठी ते चांगलं असतं."