शिकवणीच्या बहाण्याने हैवानियत
बिजनौर जिल्ह्यातील रहिवासी असलेले हे कुटुंब सध्या लखनौमध्ये स्थायिक आहे. आरोपी वीर सिंग यादव (मूळचा बांदा जिल्हा) हा मुलीला घरी येऊन शिकवत असे. २२ जानेवारी रोजी जेव्हा मुलीचे आई-वडील कामावर गेले होते आणि आजी घराबाहेर उन्हात बसली होती, तेव्हा वीर सिंगने घरात शिरून या १३ वर्षीय मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला.
बळजबरीने गर्भपात आणि धमकी
या अत्याचारांमुळे मुलगी गर्भवती राहिली. ही बाब समजताच आरोपीने तिला जबरदस्तीने काही औषधे देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. या प्रक्रियेमुळे मुलीची प्रकृती खालावली आणि शेवटी तिने धीर एकवटून आईला सर्व हकीकत सांगितली. पालकांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
राजकीय वलय आणि दहशतीचा वापर
पीडितेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, आरोपी वीर सिंग यादव हा अत्यंत प्रभावशाली असल्याचे भासवत असे. तो स्वतःला समाजवादी पक्षाशी संबंधित असल्याचे सांगत असे.
राज्यातील दोन माजी मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो दाखवून तो लोकांना आणि पीडित कुटुंबाला धमकावत असे. याच दहशतीचा वापर करून त्याने इतके दिवस हे कृत्य चालू ठेवले. घटनेचे गांभीर्य ओळखून लखनौ पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पकडण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिस त्याला लवकरात लवकर अटक करण्यासाठी काम करत आहेत.