कोरोनीलवर बाबा रामदेव यांचे असे आहे स्पष्टीकरण

गुरूवार, 2 जुलै 2020 (08:21 IST)
योगगुरू बाबा रामदेव यांनी  पतंजलीच्या कोरोनिलवर स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, हे औषध अधिक प्रभावी असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. जर रोगमुक्त भारत करणं हा गुन्हा असेल तर मी तो गुन्हा करणार, असंही ते म्हणाले. दरम्यान, आयुष मंत्रालयाला संपूर्ण अहवालही सोपवल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
 
“आपल्या शब्दांचा खेळामध्ये पडायला नको. शब्दांच्या खेळामध्ये आम्ही आयुर्वेदाला भरडू शकत नाही. आज आम्ही कोणत्याही कायदेशीर अडचणीशिवाय हे औषध बाजारात आणत आहोत. लोकं आमच्या औषधाची वाट पाहत आहेत,” असं बाबा रामदेव यावेळी म्हणाले. तसंच सांगितलेल्या नियमांप्रमाणेच या औषधाची चाचणी केल्याचंही त्यांनी नमूद केलं. आयुष मंत्रालयानंही पतंजलीची प्रशंसा केल्याचंही बाबा रामदेव म्हणाले.
 
“कोरोनिलमध्ये गिलॉय, अश्वगंधा आणि तुळस यांचं योग्य प्रमाणातील मिश्रण आहे. कोरोनिल आणि श्वासारी यांची संयुक्त चाचणी करण्यात आली. आम्ही याची निरनिराळी चाचणी केली नाही. पतंजली लोकांचं जीवन वाचवण्याचं काम करतो त्यांचा जीव घेण्याचं काम करत नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. या औषधाद्वारे ३ दिवसांच्या कालावधीत ६९ टक्के रुग्ण बरे झाले. तर ७ दिवसांमध्ये करोनाचे रुग्ण पूर्णपणे बरे झाले असल्याचा दावाही बाबा रामदेव यांनी केला. जर रोगमुक्त भारत करणं हा गुन्हा असेल तर मी तो गुन्हा करणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती