पोलीस बँकेला वेढा देऊन वाट बघत बसले, पण दरोडेखोर पैसे घेऊन आधीच पसार झालेले

शुक्रवार, 8 डिसेंबर 2023 (10:01 IST)
विष्णू नारायण
BBC
बिहारच्या आरा जिल्ह्यामध्ये बँकेवर दरोडा पडल्याची एक घटना सध्या चर्चेत आहे.
 
दरोडेखोरांनी बुधवार, 6 डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या शहराच्या मध्यभागी असलेल्या ‘ॲक्सिस बँके’ला लक्ष्य बनवत फक्त 16.5 लाख रूपये लुटून नेले नाहीत तर, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यातही ते यशस्वी झाले.
 
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना वाटलं की चोर अजूनही बँकेच्या आतच आहेत. म्हणून बँकेला चारही बाजूंनी घेराव घालण्यात आला.
 
नंतर पोलीस जेव्हा बँकेत आत गेले, तेव्हा त्यांना कळलं की देरोडेखोर आधीच फरार झाले आहेत.
 
पोलिस काय म्हणाले?
आराचे पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार यादव बीबीसीसोबत बोलताना म्हणाले की, “दरोड्याची सूचना मिळाल्यानंतर दहा मिनिटांच्या आतच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते, पण दरोडेखोर आधीच पळून गेलेले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की दरोडेखोर बँकेच्या आतच आहेत, म्हणूनच बँकेला घेराव घालण्यात आलेला. या घटनेमध्ये पोलिसांचा सव्वा तासही वाया गेला.”
 
दरोडा टाकण्यासाठी ज्योतिषाकडून मुहूर्त काढला, 1 कोटींची चोरी केली आणि...
24 ऑगस्ट 2023
9 जणांचा खून केलेल्या त्याला पोलिसांनी वेडा म्हणून सोडलं, नंतर घेतला 40 जणांचा जीव
20 ऑगस्ट 2023
वीरप्पनला जिवंत पकडू पाहणाऱ्या अधिकाऱ्याचं जेव्हा वीरप्पनने मुंडकं छाटलं आणि आठवण म्हणून ठेवून घेतलं
14 ऑगस्ट 2023
ते म्हणाले, आम्हाला साडेदहा वाजताच्या आसपास माहिती मिळाली की दरोडेखोर बँकेत घुसले आहेत. पोलिसांना बँक कर्मचाऱ्यांकडून ही सूचना मिळाली होती. सूचना मिळाल्यानंतर 10 मिनिटांच्या आतच पोलिसांचं पथक तिथे पोहोचलेलं.”
 
“बँकेच्या एका कर्मचाऱ्याने पोलिसांना सांगितलं की दरोडेखोर आतमध्येच आहेत आणि त्याने बाहेरून बँकेच्या दरवाज्याला टाळं लावलं आहे. त्यानंतर पोलिसांनी बँकेला वेढा घातला आणि लोकांना वाचवण्याचे आणि दरोडेखोरांना पकडण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी मीसुद्धा तिथे पोहोचलो, पण पस्थिस्थिती वेगळीच होती.”
 
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार 18 ते 20 वर्षांचे पाच तरूण देशी बंदूकीचा (कट्टा) धाक दाखवत आले आणि कॅश काऊंटरवर ठेवलेली जवळपास साडेसोळा लाखांची रोख रक्कम घेऊन फरार झाले. बाहेर पडताना त्यांनीच बाहेरून बँकेचं शटर बंद केलं.
 
आत्तापर्यंत कुणी दरोडेखोर पकडला गेलाय का? या प्रश्नाचं उत्तर देताना पोलीस अधीक्षक म्हणाले, “आम्ही गुन्हेगारांच्या जागेचा शोध लावत आहोत, दूरपर्यंत त्यांचा ठावठिकाणाही आम्ही शोधून काढलाय.
 
ते म्हणतात की हे स्थानिक दरोडेखोर दिसत नाहीत. “हे बँक दरोडेखोर असल्याने ते थोडे चलाखदेखील आहेत. आमचा असा अंदाज आहे की ते बाहेरचे कुठलेतरी आहेत. सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की हे स्थानिक लोक असू शकतात पण नंतर छायाचित्रांची पडताळणी केल्यानंतर असं दिसतंय की ही दरोडेखोरांची टोळी बाहेरून आलेली आहे.”, असं ते म्हणाले.
 
“अशा टोळ्या वैशाली किंवा मुझफ्फरपूर मध्ये सक्रिय आहेत, ते पटनाच्या दिशेने निघून गेले आहेत. आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
 
कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
बीबीसी सोबत बोलताना विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते विजय सिन्हा यांनी आरोप केला की, “या सरकारच्या काळात आरोपींचं मनोधैर्य वाढलंय. सरकार-प्रशासनामधील लोकांचं लक्ष्य कायदा सुवस्थेवर कमी आणि दारू-रेती आणि जमीन माफियांच्या संरक्षणावर अधिक आहे. त्यामुळे असं होतंय की कुठे दरोड पडतोय तर कुठे खून होतायत. अपहरणाच्या घटनांनाही पुन्हा सुरूवात झालेय.”
 
राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयश, वाढती गुन्हेगारी आणि भाजपच्या आरोपांना उत्तर देताना जदयू प्रवक्ते नीरज कुमार यांनी बीबीसीला सांगितलं की, “राज्यासाठी गुन्हेगारीच्या घटना या चिंताजनक आणि आव्हानात्मक दोन्हीही आहेत. पोलिस कठोरपणे कारवाईदेखील करतायत.”
 
ते म्हणतात, “ सरकार गुन्हेगारी रोखण्याबाबत पूर्णपणे गंभीर आहे. सरकार कोणत्याही गुन्हेगाराला वाचवण्याचं काम करत नाही. ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार भाजपशासित उत्तर प्रदेश सर्वांत अग्रस्थानी आहे. सरकार सर्व गोष्टी आणि घटनांची काळजी घेतंय पण जे आमच्यावर टीका करतायत त्यांनी हे आठवावं की ते सत्ताधारी असताना काय बोलत असत.”

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती