सुपरटेक नोएडा : भरवस्तीतील 32 मजली 'ट्विन टॉवर' 12 सेकंदांत उद्ध्वस्त, परिसरात धुळीचे प्रचंड लोट

रविवार, 28 ऑगस्ट 2022 (14:59 IST)
दिल्लीजवळच्या नोएडा येथे अनधिकृतरित्या बांधलेल्या दोन गगनचुंबी इमारती स्फोटकांच्या मदतीने पाडण्यात आल्या आहेत. या इमारतीचं पाडकाम करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यानुसार, या निर्णयाची आज (रविवार 28 ऑगस्ट) दुपारी अडीच वाजता अंमलबजावणी करण्यात आली.
 
विशेष म्हणजे, केवळ 12 सेकंदांमध्ये या 32 मजली दोन इमारती जमीनदोस्त झाल्या. इमारती पडल्यानंतर परिसरात धुळीचे प्रचंड लोट तयार झाले असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून पाण्याची फवारणी करण्यात येत आहे.
 
उत्तर प्रदेशमधील नोएडाच्या सेक्टर 93A परिसरात या दोन इमारती होत्या. अॅपेक्स आणि सेयान असं नाव त्यांना देण्यात आलं होतं. सुपरटेक बिल्डर्स या खासगी बांधकाम व्यावसायिकाने या इमारती बांधल्या होत्या.
 
पण इमारती बांधकाम करताना अनेक नियम पायदळी तुडवण्यात आल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळेच या इमारती पाडण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता.
 
देशात आजवरच्या इतिहासात इतक्या उंच इमारती पाडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या घटनेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं.
 
नोएडाच्या सेक्टर 93 परिसरात इमारतींचं पाडकाम पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. सगळे जण आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण टिपण्याचा प्रयत्न करत होते.
 
अखेर, दुपारी अडीचच्या ठोक्याला इमारतींमध्ये पेरण्यात आलेल्या दारुगोळ्याचा स्फोट झाला आणि क्षणार्धात दोन्ही इमारतींचं रुपांतर मातीच्या ढीगात झालं. सध्या परिसरात धुळीचं साम्राज्य पसरल्याचं दिसून येत आहे. हे निवळण्यास काही वेळ लागेल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती