'कसे काय जमते बुवा यांना हे सगळे? ते रहस्यच आहे' अशा शब्दात शिवसेनेचा सामना अग्रलेखातून भाजपा-जेडीयू युतीला टोला

मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (08:33 IST)
भाजपाला बिहारात सर्वाधिक जागा मिळाल्या तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील हे अमित शहा यांचे विधान महत्त्वाचे आहे. शहा म्हणतात, नितीशकुमार हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे आघाडी मोडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. नितीशबाबू हा एकच चेहरा बिहारात आहे, असे सगळ्यांनी ठरवूनच टाकले आहे. पण ‘सर्वाधिक जागा मिळाल्या तरी…’ हे बिहारचे सूत्र भाजपाने महाराष्ट्र किंवा इतरत्र वापरले नाही. नितीशकुमार ‘एनडीए’त जाऊन येऊन राहिले. तरी ते निष्ठावान, जुने सहकारी ठरतात. त्याबद्दल नितीशकुमारांच्या कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. कसे काय जमते बुवा यांना हे सगळे? ते रहस्यच आहे अशा शब्दात शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपा-जेडीयू युतीला टोला लगावला आहे.
 
तसेच नितीशकुमार हे जुने व भरवशाचे सहकारी आहेत हे विधान तर्कसंगत नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार हे भारतीय जनता पक्षाबरोबर नव्हते. त्यांच्या ‘जदयु’ पक्षाने लालू यादवांच्या ‘राजद’शी आघाडी करून निवडणुका लाढविल्या. त्या निवडणुकीत नितीशकुमार यांचा मुख्य शत्रू भाजप होता. भाजपानेही नितीशकुमारांवर हल्ले करण्याची मालिकाच चालवली होती. २०१४ सालात व २०२० च्या निवडणुकीत साम्यस्थळ एकच, ते म्हणजे तेव्हाही आपल्या जागा जास्त आल्या तरी मुख्यमंत्री नितीशबाबूच होतील, अशी घोषणा लालू यादव यांनी केली होती. त्याप्रमाणे ‘जदयु’च्या जागा लालू यांच्या पक्षापेक्षा कमी येऊनही मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार विराजमान झाले. पण मध्येच लालू यादवांशी काडीमोड घेऊन ते भाजपाशी सत्तासंग करून बसले. बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार हा खरोखरच विकासाचा चेहरा आहे काय? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.
 
याचे उत्तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील नगरविकास आणि गृहनिर्माणमंत्री सुरेश कुमार शर्मा यांनी दिले आहे. त्यांनी गडबड अशी केली आहे की, एक झगमगाट करणाऱ्या ‘स्ट्रीट लाइट’ने उजळून निघालेल्या फ्लायओव्हरचा फोटो स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आणि त्याला शीर्षक दिले, ‘मुझफ्फरपूर स्ट्रीट लाइट योजना.’ आता जागरुक मतदारही कामास लागले व हा भव्य सुंदर प्रकाशमान रस्ता शोधू लागले. तेव्हा संपूर्ण मुझफ्फरपूर पालथे घातले तरीही मंत्र्यांनी ‘टाकलेला’ या फोटोतील रस्ता मिळाला नाही. कारण नितीशकुमारांच्या मंत्र्यांनी ‘स्वतःचे कार्य’ म्हणून टाकलेला हा फोटो प्रत्यक्षात हैदराबादमधील रस्त्याचा होता. तर बिहारच्या विकासाचा खरा चेहरा हा असा आहे बिहारच्या विधानसभा निवडणुकीत काय होणार, यावर आतापासूनच पैजा लागल्या आहेत. पंतप्रधान मोदी हे बिहारात बारा सभा घेतील, असे जाहीर केले आहे.
 
सुशांतसिंह राजपूतच्या नावावर मते मागणे सुरूच आहे व आता हे इतर राज्यांतील विकास कामे स्वतःच्या नावावर खपविण्याचे भुरटे-भामटे उद्योगही नव्या दमाने सुरूच आहेत. बिहारमध्ये कुपोषण, भूक, रोजगाराचा प्रश्न आगडोंबासारखा उसळला आहे. आमचे बिहारी मजूर इतर राज्यांत जातात म्हणून त्या त्या राज्यांचा विकास होतो वगैरे बोलणे ठीक आहे हो, पण हे मजूर बिहार सोडून परराज्यांत जातात ते पोटाची आग विझवण्यासाठी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती