हाथरस प्रकरणात बलात्काराचा गुन्हा सिद्ध नाही, 3 जणांची निर्दोष सुटका, एकाला जन्मठेप

गुरूवार, 2 मार्च 2023 (18:29 IST)
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका दलित युवतीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात तिथल्या स्थानिक कोर्टाने एका आरोपीला दोषी ठरवलं आहे आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दोषीला 40 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.
 
या प्रकरणात बलात्काराचा आरोप सिद्ध झालेला नाही. पीडित पक्षाच्या वकिलांच्या मते कोर्टाने आरोपी संदीप सिंहला सदोष मनुष्यवध आणि एससी एसटी कायद्याअंतर्गत दोषी ठरवलं आहे.
 
या प्रकरणात तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
 
पीडित पक्षाच्या वकिलांनी सांगितलं की ते कोर्टाच्या निर्णयाने समाधानी नाहीत आणि ते आता हायकोर्टात अपील करतील.
 
सप्टेंबर 2020 मध्ये या प्रकरणाची देश आणि विदेशात चर्चा झाली आहे. पीडित युवतीने दिलेल्या जबाबाच्या आधारावर पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा सीबीआयने तपास केला होता.
 
पीडित मुलीचा दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांना तिचा मृतदेह न देता पोलिसांनी तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार केले होते. यामुळे प्रचंड नाराजी पसरली होती.
 
मानवाधिकार संघटनांसह अनेक संस्थांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. यावरून बरंच राजकारणही तापलं होतं.
 
सीबीआय ने केला होता तपास
उत्तर प्रदेश पोलिसांवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह आणि वाढता विरोध पाहता या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात आली होती.
 
सीबीआयने या प्रकरणात 11 ऑक्टोबर 2020 ला FIR दाखल केला होता. 18 डिसेंबर 2020 ला आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. सीबीआयने चारही आरोपींवर हत्या आणि सामूहिक बलात्काराचा आरोप लावला होता.
 
आरोपपत्रात उत्तर प्रदेश पोलिसांच्या निष्काळजीपणावर आरोप लावण्यात आले होते.
 
पीडित पक्ष संतुष्ट नाही
जवळजवळ अडीच वर्षानंतर गुरुवारी (2 मार्च) ला कोर्टानं निर्णय सुनावला.
 
कोर्टाच्या निर्णयानंतर पीडित पक्षाचे वकील महिपाल सिंह यांनी पत्रकारांना सांगितलं, “कोर्टाने तीन लोकांची निर्दोष मुक्तता केली आहे. संदीपला दोषी ठरवलं आहे. बलात्कार सिद्ध झालेला नाही.”
 
महिपाल सिंह यांनी सांगितलं की ते कोर्टाच्या निर्णयावर ते संतुष्ट नाही.
 
ते म्हणाले, “आम्ही निर्णयाने समाधानी नाही. या प्रकरणात आम्ही हायकोर्टात अपील करू.”
 
बचाव पक्षाचे वकील मुन्ना सिंह पुंधीर यांनी या निर्णयाला दुजोरा दिला आहे. सीबीआय ने आतापर्यंत कोणतंही विधान केलेलं नाही.
 
प्रकरणाशी निगडीत वकील म्हणाले की ते या प्रकरणावर नंतर भाष्य करतील.
 
हाथरस कोर्टाच्या बाहेर प्रचंड सुरक्षाव्यवस्था होती. स्थानिक कोर्टाच्या बाहेर लोकांनी गर्दी केली होती. अनेक पत्रकारही तिथे उपस्थित होते.
 
प्रकरण काय होतं?
सप्टेंबर 2020 मध्ये उत्तर प्रदेशातील हाथरस गावात 19 वर्षाची एक दलित तरुणी तिच्या आईबरोबर अर्धा किलोमीटर दूर गवत कापायला गेली होती.
 
पीडित पक्षाचा आरोप आहे की चार आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या आईचा आरोप आहे की जेव्हा ती तरुणीजवळ गेली तेव्हा ती जखमी अवस्थेत होती आणि तिचे कपडे फाटले होते.
 
त्यानंतर पीडितेची आई आणि तिच्या भावाने तातडीने एका मोटरसायकलवर दीड किलोमीटर दूर चंदपा ठाण्याजवळ घेऊन गेले. तिथून तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून तिला अलीगढ मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं.
 
मुलीला शुद्ध आल्यानंतर तिने अलीगढ मेडिकल कॉलेजमध्ये जबाब दिला. त्या आधारावर सामूहिक बलात्काराचा खटला दाखल करण्यात आला होता.
 
अलीगढ हून 28 सप्टेंबरला दिल्लीतल्या सफदरजंग हॉस्पिटलला तिला आणण्यात आलं. तिथे दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला.
 
पोलिसांनी तिचा चेहरा न दाखवताच 30 सप्टेंबरच्या रात्रीच त्या मुलीवर अंत्यसंस्कार केले. त्यावरून मोठा गहजब झाला.
 
या प्रकरणाची चौकशी आधी उत्तर प्रदेश, मग उत्तर प्रदेश पोलीसांची एसआयटी आणि मग सीबीआयने केली.
 
प्रकरणाशी निगडीत असलेल्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं की बलात्काराचा आरोप सिद्ध झालेला नाही.
Published By -Smita Joshi

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती