बोटावर शाई लावण्याऐवजी तोंडाला काळे फासले तर बरे

शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (10:36 IST)
लोकांच्या बोटावर शाई लावण्याऐवजी जनतेच्या तोंडाला काळे फासले असते तर बरे झाले असते अशी उपरोधिक टीका समाजवादी पक्षाचे खासदार खासदार नरेश अग्रवाल यांनी केली आहे. राज्यसभेत नोटाबंदीच्या निर्णयावर चर्चा करताना नरेश अग्रवाल म्हणाले की, ‘मी देशात अनेक पंतप्रधान बघितले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्यावेळी अहवाल मागवले होते. त्यामध्ये जनता आणीबाणीच्या बाजूने असल्याचा दावा करण्यात आला. पण १९७७ मधील निवडणुकीत वेगळे चित्र होते अशी आठवण अग्रवाल यांनी करुन दिली. देशात आर्थिक आणिबाणीच लागू झाली आहे अशी टीका त्यांनी केली. विदेशात किती काळा पैसा आहे आणि भारतात किती जणांकडे काळा पैसा आहे हे पंतप्रधानांनी जाहीर करावे. जर ६ टक्के लोकांकडे काळा पैसा असेल तर मग उर्वरित ९४ टक्के लोकांना त्रास का द्यायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महागाई सगळीकडेच आहे. परदेशात कधी त्यांचे चलन रद्द झाले नाही. काळा पैसा असलेले किती उद्योजक बँकेच्या रांगेत उभे होते, अशा असंख्य प्रश्नांची सरबत्तीच अग्रवाल यांनी सरकारवर केली. नोटाबंदीचा निर्णय देशासाठी घातक आहे. हा निर्णय देशहितासाठी नव्हे तर उत्तरप्रदेशमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला, असा दावाही त्यांनी केला. 

वेबदुनिया वर वाचा