राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत मागणी

सोमवार, 10 डिसेंबर 2018 (17:02 IST)
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. पण सरकार आणि न्यायालय त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. अतिरेक्यांसाठी रात्री न्यायालय उघडून कामकाज केले जाते तर सबंध देशातील हिंदूंच्या भावनांना मात्र प्राधान्य दिले जात नाही. निर्णय संसदेने घेऊ द्या नाही तर न्यायालयाने राम मंदिर रामजन्मभूमीवरच झाले पाहिजे असे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री प्रशांत हरताळकर म्हणाले. लातुरात झालेल्या अभूतपूर्व हुंकार सभेनंतर ते आजलातूरशी बोलत होते.
 
यावेळी संत महंत उपस्थित होते. विशेष म्हणजे एकाही राजकीय नेत्याला मंचावर बसण्याची संधी मिळाली नाही. केवळ हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी, हिंदुत्ववादी विचारवंत यांनाच मान देण्यात आला होता. यात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संघचालक, महानगरमंत्री अ‍ॅड. प्रणव रायचुरकर, अ‍ॅड. सुजीत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. खा. सुनील गायकवाड, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ, सुधाकर भालेराव, आ. विनायकराव पाटील, नागनाथ निडवदे, जिल्हा परिष अध्यक्ष मिलींद लातुरे, रामचंद्र तिरुके, प्रेरणा होनराव ही राजकीय मंडळी प्रेक्षकात पण पुढच्या रांगेत विराजमान झाली होती.
 
राम मांदिर उभारण्यासाठी देशभरात सुरु असलेले वारे आणि जनभावना ओळखून, राम मंदिर उभारणीसाठी मुस्लिमांनी सहकार्य करावे आणि न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी असे आवाहनही कार्यक्रमात प्रशांत हरताळकर यांनी केले. बंकटलाल शाळेच्या विस्तीर्ण मैदानावर प्रचंड जनसमुदाय जमा झाला होता. ही संख्या साठ हजारांपेक्षाही अधिक होती असा दावा संयोजकांनी केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती