भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी प्रमोद सावंत यांचा शपथविधी संपन्न झाला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. प्रमोद सावंत यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तसेच मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक, निलेश काब्राल यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
प्रमोद सावंत हे भाजप पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते यापूर्वी कधी मंत्री झाले नव्हते. तथापि, त्यांना आता थेट मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळणार आहे. मगोप आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही घटक पक्षांनी उपमुख्यमंत्रीपद मागितले होते. ते देण्यास भाजप ब-याच चर्चेनंतर तयार झाला.