देशाच्या सर्वात मोठ्या प्रशासकीय कामाची म्हणजेच जनगणना २०२१ ची तयारी सुरु झाली आहे. येणाऱ्या जनगणनेसाठी माहिती संकलनाच्या पद्धतीमध्ये क्रांतीकारक बदल प्रस्तावित आहेत. त्या अनुषंगाने जनगणना आयुक्त, नवी दिल्ली कार्यालयाने ३ ते ११ जून या कालावधीत पुणे येथील यशदामध्ये राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन महाराष्ट्राच्या जनगणना संचालक रश्मी झगडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांनी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि गोवा राज्यांमधील प्रशिक्षकांना यशदा येथे प्रशिक्षण दिले. हे राज्यस्तरीय प्रशिक्षक पुढील टप्प्यात जिल्हास्तरीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी राज्यस्तरीय प्रशिक्षकांनी पुणे जिल्ह्यातील निवडक ग्रामीण आणि शहरी भागात चाचणीसाठी माहिती संकलन केले. दरम्यान, प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी झगडे यांनी ‘प्री–टेस्ट’ ही जनगणनेची रंगीत तालीम असल्याने त्यातील प्रत्येक टप्प्यात बिनचूक काम झाल्यास प्रत्यक्ष जनगणनेची प्रश्नावली, सूचना पुस्तिका, माहिती संकलनाची पद्धती आणि माहिती संस्कारणाची पद्धती सुनिश्चित करणे शक्य होईल, असे प्रतिपादन केले.