पीएम मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक, बिटकॉइनवर ट्विट

रविवार, 12 डिसेंबर 2021 (09:58 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट शनिवारी रात्री उशिरा हॅकर्सनी हॅक केले आणि बिटकॉइनशी संबंधित एका ट्विटने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, लवकरच हे ट्विट पीएम मोदी यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हटवण्यात आले आणि आता त्यांचे ट्विटर हँडल पूर्णपणे सुरक्षित करण्यात आले आहे. हॅकर्सनी ट्विट करून लिहिले की, भारताने बिटकॉइनला कायदेशीर मान्यता दिली आहे.
केंद्र सरकारने भारतात क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता दिलेली नाही. अशा परिस्थितीत हॅकर्सनी बिटकॉईन बाबत केलेल्या ट्विटमुळे ट्विटरवर खळबळ उडाली. मात्र, नंतर पीएमओने पीएम मोदींचे ट्विटर हँडल सुरक्षित करण्यात आल्याची माहिती दिली.
हॅकर्सनी पीएम मोदींच्या ट्विटर हँडलवरून दोन ट्विट केले. पहिले ट्विट शनिवारी रात्री  2:11 वाजता आले, ज्यात म्हटले होते की, 'भारताने बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिली आहे. सरकारने 500 BTC विकत घेतले आहे आणि ते सामान्य लोकांमध्ये वितरित केले जात आहे. भारत त्वरा करा... भविष्य आज आले आहे!' हे ट्विट पीएम मोदींच्या ट्विटर हँडलवर दोन मिनिटे राहिले आणि नंतर डिलीट करण्यात आले.
पीएम मोदींचे अकाऊंट हॅक केल्यानंतर केलेले ट्विट नंतर डिलीट करण्यात आले
यानंतर, दुसरे ट्विट केवळ 3 मिनिटांच्या अंतराने म्हणजेच रात्री  2.14 वाजता केले गेले, ज्यामध्ये आधीच्या ट्विटचे शब्द पुन्हा सांगितले गेले. मात्र काही मिनिटांत तेही हटवण्यात आले. मात्र, तोपर्यंत पीएम मोदींच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विटरवर केलेल्या या ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते.
पंतप्रधानांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती देताना पीएमओने सांगितले की, पीएम मोदींच्या ट्विटर अकाऊंटशी छेडछाड करण्यात आली होती, ती लगेच दुरुस्त करण्यात आली. याबाबत ट्विटरनेही माहिती दिली आहे. तसेच, पीएमओने सांगितले की, यावेळी पीएम मोदींच्या अकाऊंटवरून केलेल्या ट्विटकडे दुर्लक्ष करा.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती