PM मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, बीनामध्ये विरोधकांवर बरसले

गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (17:15 IST)
PM Modi attack INDIA alliance मध्य प्रदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधी आघाडीवर हल्लाबोल करताना पंतप्रधान म्हणाले की या अहंकारी युतीला देशाला मागे घेऊन जायचे आहे, पण भाजप असे होऊ देणार नाही.
 
पीएम मोदी प्रथम बीना येथे पोहोचले आणि बीना रिफायनरी येथे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससह 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. बीनामध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाले की जी -20 शिखर परिषदेच्या यशाचे श्रेय मोदींना नाही तर देशातील 140 कोटी जनतेला आणि त्यांच्या "सामूहिक शक्तीला" जाते.
 
I.N.D.I.A. विरोधी आघाडीवर हल्ला करताना पंतप्रधान म्हणाले की, ही आघाडी सनातन संस्कृती नष्ट करण्याचा अजेंडा घेऊन चालत आहे. यासोबतच पंतप्रधानांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवत काही पक्ष जागतिक मंचावर भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
 
पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारत एक जागतिक नेता म्हणून उदयास येत आहे, काही पक्ष देश आणि तेथील लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. हे लोक INDI-Aliance अंतर्गत एकत्र आले आहेत आणि ही अहंकारी युती आहे. यासोबतच विरोधी आघाडीवर मोठा आरोप करत पंतप्रधान म्हणाले की, I.N.D.I.A.ने तिसर्‍या बैठकीत सनातन संस्कृती नष्ट करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. पंतप्रधान म्हणाले की, या लोकांना देशाला 1000 वर्षे गुलामगिरीत ढकलायचे आहे.
 
पंतप्रधान म्हणाले की, सनातन धर्माच्या प्रत्येक अनुयायी आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील देशभक्तांना सतर्क राहावे लागेल, कारण अहंकारी युती सनातनला नष्ट करण्यात गुंतलेली आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की काँग्रेसने मध्य प्रदेशात दीर्घकाळ राज्य केले, परंतु त्यांनी भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्याशिवाय काहीही केले नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती