प्लॅस्टिक बंदी शिथिल, रिसायकलिंगची जबाबदारी दुकानदारावर

गुरूवार, 28 जून 2018 (09:10 IST)
मोठय़ा उत्पादकांना आपले उत्पादन प्लॅस्टिक पॅकिंगमध्ये देण्याची सवलत आता किरणा दुकानांवरील प्लॅस्टिक पॅकिंगलाही लागू होणार आहे. पाव किलोपेक्षा अधिक वजनाचा माल पॅकिंग करण्यासाठी ही सूट देण्यात आली असून हे प्लॅस्टिक पुन्हा रस्त्यावर येणार नाही, त्याचे रिसायकलिंग केले जाईल याची काळजी या दुकानदारांना घ्यावी लागणार आहे. याविषयीची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. 
 
किराणा दुकानदारांना प्लॅस्टिक पॅकिंगमध्ये देण्यात आलेल्या सवलतीबाबतची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. ते म्हणाले, किरणा दुकानदारांच्या शिष्टमंडळाने प्लॅस्टिक पॅकिंगसाठी सूट मिळावी म्हणून शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. प्लॅस्टिक पॅकिंगविषयीच्या या प्रस्तावाबाबत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत किरणा दुकानांवरील प्लॅस्टिक पॅकिंगसाठी असलेली बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून याविषयीचे परिपत्रक लवकरच काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती