मुंबईत कोरोना नियमांचे पालन करून छटपूजा करण्यास परवानगी

मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (22:24 IST)
मुंबईत कोरोना नियमांचे पालन करून छटपूजा करण्यास पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी परवानगी दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गतवर्षीप्रमाणेच यंदाही दिवाळीनंतर येणाऱ्या छटपूजेला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजपतर्फे स्थायी समिती सदस्य आणि प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी पालिका आयुक्त चहल यांच्याकडे केली होती. याबाबतची माहिती शिरसाट यांनी दिली होती.
 
मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने काही निर्बंध लागू केले होते. मात्र कोरोनाची पहिली लाट नियंत्रणात आल्यावर निर्बंध शिथिल करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. त्यावर पुन्हा काही निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनावर विविध उपाययोजना करून कोरोनाची दुसरी लाटही नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आले आहे.
 
मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतातील लोक वास्तव्य करतात. उत्तर भारतात दिवाळीनंतर लगेचच छटपूजा या धार्मिक विधीचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते. सदर छटपूजा ही सूर्य देवतेची पूजा असल्याने ती उघड्या मैदानातच करावी लागते आणि ती घरी करता येत नाही. गेले कित्येक वर्षे मुंबई शहरातसुद्धा छटपूजेचे आयोजन चौपाटी परिसरात आणि अन्यत्र केले जाते. गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर रोजी छटपूजेसाठी नियमावली बनवून मर्यादित स्वरुपात परवानगी दिलेली होती. त्याच धर्तीवर यावर्षीही परवानगी द्यावी आणि तसे परिपत्रक जारी करावे, अशी मागणी भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी पत्राद्वारे पालिका आयुक्त यांच्याकडे केली होती.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती