देशभरात १ जुलैपासून शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. शाळा सरू होण्याच्या बातम्यांनी देशासह जगभरातील पालकवर्ग आपल्या मुलांच्या सुरक्षेच्या कारणास्तव चिंतेत आहेत. त्यातूनच मग जगभरातील पालकांनी ऑनलाईन अभियान सुरू केले आहे. त्याचप्रमाणे भारतातही आपल्या पाल्याच्या सुरक्षेसाठी चिंतेत असणार्या पालकांनी कोरोना संपत नाही तोवर शाळा बंद ठेवण्यासाठीची ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. ज्यावर पाच लाखांपेक्षा अधिक पालकांनी स्वाक्षर्या केल्या आहेत.
ऑनलाईन स्वाक्षऱ्या अभियानासाठी जगातील प्रसिध्द वेबसाईट चेंज डॉट ओआरजीवर केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरिया निशंक यांच्याकडे तूर्त शाळा बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. वेबसाईटवर चालणाऱ्या या अभियानासाठी १ लाख स्वाक्षऱ्यांचे लक्ष ठेवण्यात आले होते. मात्र या याचिकेवर ५,२६,८४४ स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. पालकांची मागणी आहे की, डिजिटल शिक्षण सुरू ठेवत, २०२० ला केवळ 'लर्निंग ईयर' म्हणून पाहिले जावे. तसेच कोरोना मुळापासून संपत नाही तोवर शाळांना बंदच ठेवण्यात यावे.