ओखी चक्रीवादळामुळे मंगळवारी सकाळपासून मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक मंदावली असून पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही ५ ते १० मिनिटे उशिराने सुरु आहे. दुसरीकडे हवामान खात्याने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे ]मंगळवारी मुंबई महानगर प्रदेशातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
दक्षिण भारताला झोडपणारे ओखी चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने सरकत आहे. ओखी चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांत येत्या चोवीस तासांत आणखी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपर्यत ते सुरतजवळ स्थिरावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातील शाळांना सुट्टी देण्यात आली असली, तरी महाविद्यालयांत होणाऱ्या परीक्षा पूर्वनियोजीत वेळेनुसारच होणार असल्याचे मुंबई विद्यापीठाकडून कळवण्यात आले.