जेडीयूने दिला राजदला थेट इशारा

शनिवार, 15 जुलै 2017 (11:18 IST)
पाटणा -बिहारमध्ये सत्तेवर असणाऱ्या महाआघाडीच्या मित्रपक्षांमधील तणाव आणखीच वाढला आहे. राजदने स्वत:कडे 80 आमदार असल्याची मग्रुरी दाखवू नये, असा थेट इशाराच जेडीयूने दिला आहे.
 
भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात सीबीआयने बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना आरोपी बनवले आहे. तेजस्वी हे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आहेत. सीबीआयच्या कारवाईनंतर राजद आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूमध्ये तणातणी सुरू झाली आहे. अशातच राजदचे नेते आपल्याकडे सर्वांधिक आमदार असल्याचे म्हणत जेडीयूवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे संतापलेल्या जेडीयूने आज पलटवार केला. राजद 80 आमदार असल्याची मग्रुरी दाखवत आहे. त्या पक्षाचे 2010 मध्ये केवळ 22 आमदार निवडून आले. महाआघाडीचे नेतृत्व नितीश यांच्यासारख्या विश्‍वासार्ह चेहऱ्याकडे असल्यानेच 2015 च्या विधानसभा निवडणुकीत राजदचे आमदार वाढले हे त्या पक्षाने विसरू नये, असे जेडीयूचे मुख्य प्रवक्ते संजय सिंह यांनी म्हटले. मर्यादेत राहून राजदने तेजस्वी यांचे निर्दोषत्व सिद्ध करावे, या जेडीयूच्या भूमिकेचा त्यांनी पुनरूच्चार केला. बिहारमधील सत्तारूढ महाआघाडीच्या घटक पक्षांमध्ये जेडीयू, राजदबरोबरच कॉंग्रेसचा समावेश आहे. त्या राज्यात विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. राजदचे 80, जेडीयूचे 71, कॉंग्रेसचे 27 तर विरोधी बाकांवर असणाऱ्या भाजपचे 53 सदस्य आहेत.
नितीश यांच्या स्वच्छ प्रतिमेला तडा जाऊ नये यासाठी जेडीयूने मित्रपक्ष राजदवर तेजस्वी यांच्यावरील आरोपांबाबत दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यातून दोन्ही पक्षांत बेबनाव निर्माण झाला आहे. त्यामुळे महाआघाडीतील तिसरा घटक असणाऱ्या कॉंग्रेसची फरफट होत आहे.
 
सोनियांची मध्यस्थी 
महाआघाडीत फाटाफूट होऊ नये यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे. त्यातून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी मध्यस्थीसाठी पुढे सरसावल्याचे समजते. त्यांनी नितीश आणि लालूंशी दूरध्वनीवरून चर्चा केली. दोघांनाही मान्य होईल असा तोडगा काढण्याचा सल्ला सोनियांनी दिला, अशी माहिती कॉंग्रेस सुत्रांकडून देण्यात आली.

वेबदुनिया वर वाचा