Nipah Virus : केरळ मध्ये पुन्हा निपाह व्हायरसचा शिरकाव झाला असून निपाह व्हायरसच्या संसर्गामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याने केरळमध्ये घबराटीचे वातावरण आहे. येथे आरोग्य विभागाने कोझिकोड जिल्ह्यात अलर्ट जारी केला आहे. केरळच्या आरोग्य विभागाने निपाह व्हायरसबाबत राज्य सरकार अत्यंत सतर्क असल्याची माहिती दिली असून राज्यात दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर वाढता संसर्ग पाहता परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही घेतली आहे.
खासगी रुग्णालयात तापामुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. निपाह व्हायरसच्या संसर्गामुळे या दोन रुग्णांचा मृत्यू झाला असावा, असा संशय आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मृतांपैकी एकाच्या नातेवाईकांनाही आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
भारतात निपाह व्हायरसचा पहिला रुग्ण कोझिकोडमध्ये 19 मे 2018 रोजी आढळून आला होता.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, निपाह व्हायरसचा संसर्ग हा एक झुनोटिक रोग आहे, जो प्राण्यांद्वारे मानवांमध्ये पसरतो. हा संसर्ग दूषित अन्नाद्वारे किंवा थेट एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो . निपाह व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाला श्वास घेण्यास गंभीर त्रास होतो आणि त्याला एन्सेफलायटीस सारखे आजार होतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, निपाह व्हायरसचा संसर्ग झालेला रुग्ण 24 ते 48 तासांत कोमात जाऊ शकतो.मलेशियातील एका गावाच्या नावावरुन निपाह हे नाव देण्यात आले.