सैन्याचे जवान आहेत, मग जीव तर जाणारच- खा. नेपालसिंह

मंगळवार, 2 जानेवारी 2018 (11:17 IST)
‘सैन्याचे जवान आहेत, मग त्यांचे प्राण जाणारच. असा कोणताही देश दाखवा जिथे सैन्याचे जवान मरत नाही’ असे विधान नेपालसिंह यांनी केले आहे. नेपालसिंह यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत असून सैन्यातील जवानांचा अपमान करणाऱ्या नेपालसिंह यांनी माफी मागावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
 
सीमारेषेवर अत्यंत कठीण परिस्थितीत देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांविषयी नेपालसिंह यांनी असे बेताल विधान केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वाद निर्माण होताच नेपालसिंह यांनी सारवासारव केली आहे. माझ्या विधानाचा तो अर्थ नव्हता, असे त्यांनी सांगितले.
 
नेपालसिंह यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य
 
जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १८५ व्या बटालियनच्या मुख्यालयावर रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील रामपूरचे खासदार नेपालसिंह यांना प्रश्न विचारण्यात आला.
 
यावेळी ते म्हणाले, सैन्याचे जवान असल्याने त्यांचा जीव जाणारच. असा कोणता देश आहे की जिथे सैन्यातील जवान मरत नाही. आपल्या विधानाचे समर्थन करताना त्यांनी थेट गल्लीतील भांडणाचा दाखला दिला. गावात जेव्हा भांडण होते, त्यावेळीही हाणामारीत किमान एक तरी व्यक्ती जखमी होतेच, असे त्यांनी सांगितले.
 
नेपालसिंह यावरच थांबले नाही. त्यांनी पत्रकारांनाच प्रश्न विचारला. मला तुम्ही असे डिव्हाईस दाखवा की ज्यामुळे माणूस मरणार नाही. बंदुकीची गोळीही परिणाम करु शकणार नाही, अशी वस्तू दाखवा, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती