- राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह...
अहमदनगरमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची हत्या होत आहे. मुख्यमंत्र्यांना राज्याची कायदा सुव्यवस्था हाताळता येत नाही. हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते व प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश अंबादास राळेभात आणि राकेश अर्जुन राळेभात यांच्या हत्येच्या निषेधार्थ काल जामखेड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला त्यावर मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन युवक कार्यकर्त्यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघाची ही अवस्था आहे तर संपूर्ण जिल्ह्याची काय अवस्था असेल असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांनी उपस्थित केला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांचा पोलिस यंत्रणेवर वचक राहिला नाही. त्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही घुले यांनी केली.
दरम्यान काल सकाळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अहमदनगर पोलिस अधिक्षक कार्यालय येथे पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन जामखेड येथील हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे उपस्थित होते.