नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांचं निधन, अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान अहमदाबादमध्ये दाखल

शुक्रवार, 30 डिसेंबर 2022 (08:32 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांचं वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं आहे. बुधवारी (28 डिसेंबरला) त्यांची तब्येत खालावली होती आणि त्यांना अहमदाबागमधील केयून मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
 
पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणतात, “शंभर वर्षाचं आयुष्य आता ईश्वराच्या चरणी लीन झालं आहे. तिचा प्रवास एका तपस्वीसारखा होता. ती निष्काम कर्मयोगाचं प्रतिक होती आणि तत्त्वाशी एकनिष्ठ होती."
मोदींनी पुढे लिहिलंय, "जेव्हा मी माझ्या आईला तिच्या 100 व्या वाढदिवशी भेटलो तेव्हा तिनं एक गोष्ट सांगितली, जी नेहमी लक्षात राहिल. ती म्हणजे, बुद्धिमत्ता वापरुन काम करायचं आणि शुद्धतेनं जीवन जगायचं."
 
दरम्यान, पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहचले आहेत.
 
यावर्षीच 18 जूनला पंतप्रधान मोदी यांनी हिराबेन यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला होता. आपल्या आईच्या शंभराव्या वाढदिवसासाठी ते गांधीनगरला गेले होते.हिराबेन यांना 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक भावूक ब्लॉगही लिहिला होता.
 
त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, “आज मी माझा आनंद, सौभाग्य तुमच्या सगळ्यांसोबत वाटतोय. माझी आई आज 18 जूनला शंभराव्या वर्षांत प्रवेश करत आहे. म्हणजेच तिचं जन्म शताब्दी वर्ष सुरू होतंय. आज माझे वडील असते, तर गेल्या आठवड्यात तेसुद्धा शंभर वर्षांचे झाले असते.”
 
पंतप्रधान मोदींनी पुढे लिहिलं होतं, “आज माझ्या आयुष्यात जे काही चांगलं आहे, माझ्या व्यक्तिमत्त्वात जो चांगुलपणा आहे. तो माझ्या आई-वडिलांमुळेच आहे. इथे दिल्लीत असताना कितीतरी जुन्या गोष्टी आठवत आहेत.”
 
सोशल मीडियावर भावपूर्ण प्रतिक्रिया
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केलंय की, “पंतप्रधान मोदींच्या आई हिरा बा यांच्या निधनाची यांच्या निधनाची मबातमी कळून खूप दुःख झालं. आई ही माणसाच्या आयुष्यातील पहिली मैत्रीण आणि गुरू असते, तिला गमावल्याचं दुःख हे जगातील सर्वांत मोठं दुःख आहे.
 
“हिरा बा यांनी कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी केलेला संघर्ष सर्वांसाठी आदर्श आहे. त्यांचं त्यागाचं तपस्वी जीवन सदैव आपल्या स्मरणात राहील. या दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण देश पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कुटुंबासोबत उभा आहे. करोडो लोकांच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत.”
 
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईच्या निधनानं मला खूप दुःख झालं आहे. आईच्या मृत्यूनं माणसाच्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण होते जी भरून काढणे अशक्य असते. या दुःखाच्या प्रसंगी मी पंतप्रधान आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.”
 
 
“हिराबेन यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. अत्यंत खडतर आणि संघर्षमय जीवन जगताना हिरा बाजींनी आपल्या कुटुंबाला जी मूल्ये दिली, संस्कार दिले, त्यातून देशाला नरेंद्रभाईंसारखा नेता लाभला,” असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
 
भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विट केलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईच्या निधनाबद्दल मी दु:ख व्यक्त करतो. देवाच्या सृष्टीत आई आणि मुलाच्या नात्याइतके अनमोल आणि अवर्णनीय असं काहीही नसतं.”
 
केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट करत म्हटलं की, “एक प्रेमळ आई जिनं देशाला सर्वांत मौल्यवान हिरा दिला. एक गौरवशाली शतक देवाच्या चरणी विसावलं. पंतप्रधानांच्या आईच्या दुःखद निधनाबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो.”
 
“मुलासाठी आई ही संपूर्ण जग असते. आईचे निधन हे मुलासाठी असह्य आणि कधीही भरून न येणारे नुकसान आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचे निधन अत्यंत दुःखद आहे. प्रभू श्री राम दिवंगत पुण्य आत्म्यास आपल्या पावन चरणी स्थान देवो,” असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लिहिलं आहे.
भाजपचे लातूरचे खासदार सुधाकर श्रंगारे यांनी ट्विट केलंय की, “मायेचे छत्र हरपले! प्रेम, करुणा आणि कर्तव्यपरायणतेचा संगम, पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री आदरणीय श्रीमती हीराबेन मोदी यांच्या दुःखद निधनाने आम्हावरील मायेचे छत्र हरपले आहे.”
 
Published By- Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती