भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीत टेंडर भरणा-या सर्वाधिक व्यक्ती या मुख्य आरोपी सुनील देवकीनंदन झंवर याच्याशी संबंधित असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे याबाबत पुढील तपास करण्यासाठी विशेष सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयाने झंवर याच्या पोलिस कोठडीत 23 ऑगस्टपर्यंत वाढ केली.
पतसंस्थेची मालमत्ता खरेदी करण्यासाठी ठेवीदारांच्या ठेव पावत्या स्वत: खरेदी करून त्या वर्ग केल्याचे झवर याने मान्य केले आहे. बीएचआर पतसंस्थेचे सॉफ्टवेअर बनविणारा आरोपी कृणाल शहा याने झवर याच्या साई सेवा पार्सल या कंपनीचे सॉफ्टवेअर बनविले असून यामध्ये त्यांचे आर्थिकसंबंध राहिले आहेत. कर्जामध्ये ठेवी वर्ग करण्याकरिता ठेवी आणून देणारा एजंट आकाश माहेश्वरी हा झंवरचा शालेय पोषण आहाराचा ठेकेदार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या फॉरेन्सिक ऑडिट दरम्यान त्याचे राजकीय व इतर व्यक्तींशी आर्थिक लागेबांधे असल्याचे मिळाल्याची माहिती माहिती विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी शुक्रवारी न्यायालयाला दिली.
या प्रकरणात आतापर्यंत 19 जणांना अटक झाली असून 72 कोटी 56 लाख 21 हजार 156 रुपयांचा अपहार झाल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. तर दागिने आणि रोख रक्कम एसा एकूण 30 लाख पाच हजार 436 रुपयांचा ऐवज आरोपींच्या घरझडतीत जप्त केला आहे. झवर याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.