दहशतवादी बनलेला पीएच डी चा विद्यार्थी निलंबित

मंगळवार, 9 जानेवारी 2018 (09:25 IST)
एएमयू (अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी)मधील पीएचडीचा विद्यार्थी मनान बशीर याला युनिव्हर्सिटीतून निलंबित करण्यात आले आहे. मनान बशीर हा रिसर्च स्कॉलर असून तो हिज्बुल मुजाहिदीन हा दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची खबर होती. त्याचा एक -47 हाती घेतलेला एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
 
मिळालेल्या माहितीनुसार मनान बशीर हा उत्तर काश्‍मीरच्या कूपवाडा जिल्ह्यातील लोलाब गावचा रहिवासी आहे. त्याने अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीतून एमफिल केले आहे. आणि आता तो जिऑलोज़ी विषयात पीएचडी करत होता. 5 जानेवारी रोजी तो दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची माहिती मिळाली होती, मात्र सोशल मीडियावरील त्याचा एके-47 सह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युनिव्हर्सिटीने त्याच्यावर कार्यवाही करून त्याला निलंबित केले आहे.
 
या संदर्भात तपासापूर्वी काहीही सांगता येणार नाही, असे पोलीसांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वीही जम्मू-काश्‍मीरमधील अनेक युवक शांतीचा मार्ग सोडून दहशतवादाकडे वळलेले आहेत. आणि त्यातील काही परतून मुख्य प्रवाहात आले आहेत. काही दिवसांपूर्वी फुटबॉलपटू मजिद खान दहशतवादी बनला होता मात्र नंतर आपल्या मातेच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्याने दहशतवादाचा मार्ग सोडला होता आणि पुन्हा मुख्य प्रवाहात सामील झाला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती