मिळालेल्या माहितीनुसार, धुळवड उत्सवादरम्यान रंग आणि गुलाल उधळत असताना ही आग लागली.अचानक आग भडकली आणि चांदीच्या पत्रावर लावलेले फ्लेक्सला आग लागली.या फ्लेक्सचा जळलेला भाग खाली पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगीत पुजारी व सेवक जळून खाक झाले. सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी नीरज सिंह आणि एसपी प्रदीप शर्मा रुग्णालयात पोहोचले. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. सहा पुजारी आणि सेवकांना उपचारासाठी इंदूरला पाठवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.घटनेवेळी सीएम मोहन यादव यांचा मुलगा आणि मुलगीही मंदिरात उपस्थित होते. दोघेही भस्मार्ती पाहायला गेले होते. दोघेही सुरक्षित आहेत.
यावेळी मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती होती. सर्वजण महाकाल सोबत होळी साजरी करत होते. जखमी सेवकाने सांगितले की, मागून आरती करत असलेल्या पुजाऱ्यावर कोणीतरी गुलाल ओतला. गुलाल दिव्यावर पडला. गुलालात रसायन असल्याने आग लागली असावी. दुसरीकडे, गर्भगृहाच्या चांदीच्या भिंतीला रंग आणि गुलालापासून संरक्षण करण्यासाठी फ्लेक्स लावण्यात आले होते. यामध्येही आग पसरली. काही लोकांनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गर्भगृहात आरती करत असलेले संजीव पुजारी, विकास, मनोज, सेवाधारी आनंद कमल जोशी यांच्यासह 13 जण भाजले.या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याची चौकशी समिती करेल.