काश्मीर खोऱ्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवणार: सुब्रमण्यम

शनिवार, 17 ऑगस्ट 2019 (10:07 IST)
श्रीनगर: ३७० कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने हटविण्यात येणार आहे. आज अनेक ठिकाणी टेलिफोन, लँडलाइन सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. पुढच्या आठवड्यात शाळा सुरू करण्यात येणार आहे. सोमवारी रस्ते वाहतूक सुरू करण्यात येईल, जम्मू-काश्मीरमध्ये एकही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मुख्य सचिव बी. एस. सुब्रमण्यम यांनी दिली. सुब्रमण्यम यांनी आज (ता.१६) पत्रकार परिषदेमध्ये काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले, की सरकारकडून वेळेनुसार सूट देण्यात आली होती. ईदसाठीसुद्धा लोकांना सूट देण्यात आली. जे लोक हज यात्रा करून परतत आहेत, त्यांनाही सुरक्षा दिली जात आहे.
 
सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया पाहता केंद्र सरकारने महत्त्वाची पावलं उचलली आहेत. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. राज्यात निर्बंध लादल्यापासून एकाचाही बळी गेला नसून एकही जण जखमी झालेला नाही, असं सांगतानाच आगामी काळात राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं. तसेच काश्मीरमध्ये एकही जीव गेला नसल्याचे सुब्रमण्यम यांनी सांगितले. पाकिस्तानकडून सातत्याने परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सुब्रमण्यम म्हणाले. त्यांनी प्रयत्न करूनही त्यामध्ये यश आले नसल्याचे त्यांनी सांगितले. लश्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचा त्यांनी थेट उल्लेख केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती