पाकिस्तानी गोळीबारात 8 नागरिक जखमी

गुरूवार, 19 ऑक्टोबर 2017 (09:51 IST)
जम्मू -पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधी भंगाचे सत्र कायम ठेवत आज जम्मू-काश्‍मीरच्या पूँच आणि राजौरी जिल्ह्यांत मारा केला. त्यात आठ नागरिक जखमी झाले. जखमींमध्ये दोन वर्षीय बालिकेचाही समावेश आहे.
 
पाकिस्तानी सैनिकांनी आगळीक करत नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत असणाऱ्या भारतीय सीमा नाक्‍यांबरोबरच नागरी भागांना लक्ष्य केले. त्यांनी गोळीबाराबरोबरच तोफगोळ्यांचा मारा केला. त्यामध्ये पूँच जिल्ह्यात पाच जण तर राजौरी जिल्ह्यात तीन जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पाकिस्तानी माऱ्यात तीन वाहनांचेही नुकसान झाले.
 
पाकिस्तानच्या चिथावणीखोर माऱ्याला भारतीय सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भारत आणि पाकिस्तानमध्ये 2003 या वर्षात शस्त्रसंधी करार झाला. या कराराचा भंग करण्याचे सत्रच पाकिस्तानी सैनिकांनी चालू वर्षात आरंभले आहे. त्यांनी यावर्षात आतापर्यंत सहाशेहून अधिक वेळा शस्त्रसंधी भंगाची आगळीक केली आहे. पाकिस्तानी माऱ्याला जबरदस्त प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. त्यात मोठी हानी होत असूनही पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या कुरापती थांबलेल्या नाहीत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती