भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) आता आणखी एक इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. पहिल्यांदाच चार टन वजनाचा उपग्रह अवकाशात पाठवण्याचा इतिहास इस्त्रो मे महिन्यात रचणार आहे. आतापर्यंत केवळ २.२ टन वजनापर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता इस्त्रोच्या रॉकेट्समध्ये होती. त्याहून अधिक वजनाच्या उपग्रह प्रक्षेपणासाठी परदेशी लाँचिंग रॉकेट वापरण्यात येत होते.
इस्त्रोच्या श्रीहरिकोटा अवकाश केंद्रातून हा उपग्रह झेपावेल. इस्त्रोचे प्रमुख एस. किरण कुमार म्हणाले, चार टन वजनाचा उपग्रह प्रक्षेपित करणाऱ्या प्रक्षेपकाचे नाव जीएसएलव्ही-एमके ३डी-१ आहे. हे प्रक्षेपण यशस्वी झाल्यानंतर भारताला अवकाशात जास्त वजनाचे उपग्रह पाठविण्यासाठी बनावटीच्या प्रक्षेपकांवर अवलंबून राहावे लागणार नाही. याशिवाय आता भारत ४ टन वनजाच्या उपग्रहांच्या निर्मितीवरही लक्ष केंद्रीत करत आहे.
शेती आणि पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठीदेखील इस्त्रोने पुढाकार घेतला आहे. कर्नाटकाच्या स्टेट कॉफी बोर्डाने राज्यातल्या कॉफीच्या शेतीसाठी इस्त्रोशी करार केला आहे. या करारानुसार राज्यात एकूण किती हेक्टर क्षेत्रावर कॉफीचे उत्पादन घ्यावे याची माहिती इस्त्रो रिमोट सेंसिंग तंत्रज्ञानाद्वारे सांगणार आहे. उत्तर-पूर्वेच्या राज्यांनाही ही माहिती दिली जाणार आहे. देशात पाण्याचे किती स्त्रोत आहेत, याची माहितीही इस्त्रो देणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने यासाठी करार केला आहे.