हिंदूंची संख्या भारतात खरंच कमी होतेय का?

गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (18:22 IST)
सौतिक बिस्वास
अमेरिकेतील आघाडीची सर्वेक्षण संस्था प्यू रिसर्च सेंटरच्या एका पाहणीत असं आढळून आलं आहे की, भारतात सर्व धर्मीयांमध्ये प्रजनन दर खूपच कमी झाला आहे. म्हणजे मूल जन्माला घालण्याचं प्रमाण घटलं आहे. आणि याचा परिणाम म्हणून 1951 नंतर भारतीय लोकसंख्येचं धार्मिक स्वरुप आणि टक्केवारीही बदलत आहे.
 
अजूनही हिंदू आणि मुस्लीम हे देशातील दोन प्रमुख धर्म आहेत. आणि दोन्ही धर्मांची मिळून लोकसंख्येची टक्केवारी 94% आहे, म्हणजे जवळ जवळ 1 अब्ज 20 कोटी.
 
आणि उर्वरित 6% जनता ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि जैन धर्मीय आहे.
 
प्यू रिसर्च संस्थेनं केलेलं हे संशोधन दर दहा वर्षांनी होणारी जनगणना आणि राष्ट्रीय कुटुंबकल्याण सर्वेक्षणातून समोर येणाऱ्या आकडेवारीच्या आधारावर केलं आहे.
 
भारताच्या धर्मावर आधारित लोकसंख्येत नेमके काय बदल होत आहेत आणि त्यामागे कुठली प्रमुख कारणं आहेत ती समजून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आलं.
 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकसंख्येत झाले असे बदल…
1947मध्ये झालेल्या फाळणीनंतर आतापर्यंत भारतीय लोकसंख्या तिपटीपेक्षा जास्त वाढली आहे. 1951मध्ये लोकसंख्या 36 कोटी इतकी होती, जी 2011मध्ये 120 कोटी इतकी झाली.
 
स्वतंत्र भारतात पहिली जनगणना 1951मध्ये तर शेवटची जनगणना 2011मध्ये झाली आहे.
आणि प्यू रिसर्च सेंटरच्या पाहणीनुसार, या कालावधीत भारतात सर्वच धर्मीयांची संख्या वाढली आहे.
 
हिंदूंची संख्या 30 कोटींवरून 96.60 कोटींवर गेली. मुस्लीम धर्मीयांची संख्या साडे तीन कोटींवरून 17.2 कोटींवर गेली. तर ख्रिस्त धर्मीयांची लोकसंख्या 80 लाखांवरून 2 कोटी 80 लाखांवर गेली.
 
देशातील धर्मावर आधारित लोकसंख्येची टक्केवारी आणि तिची वैशिष्ट्यं
2011मध्ये झालेल्या जनगणनेनुसार, भारतात हिंदूंची एकूण संख्या 121 कोटी म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 79.8% आहे. जगातील एकूण हिंदूंपैकी 94% हिंदू भारतात राहतात.
 
भारतातील मुस्लीम लोकसंख्या 14.2% आहे. आणि इंडोनेशियाच्या खालोखाल सर्वाधिक मुस्लीम लोक भारतात राहतात.
 
ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि जैन यांची लोकसंख्येतील टक्केवारी 6% आहे.
 
2011च्या जनगणनेत 30 हजार भारतीयांनी ते नास्तिक असल्याचं सांगितलं आहे.
 
जवळ जवळ 80 लाख लोक हे वर सांगितलेल्या प्रमुख सहा धर्मांच्या बाहेरचे आहेत.
 
या आधी झालेल्या जनगणनेनुसार, भारतात 83 छोटे धर्मसमूह आहेत. आणि त्यांचे कमीत कमी 100 अनुयायी होते.
 
भारतात दर महिन्याला 10 लाख नवीन लोक रहायला येतात. आणि हा दर कायम राहिला तर 2030 पर्यंत भारत चीनला मागे टाकून जगातील सगळ्यांत मोठ्या लोकसंख्येचा देश होईल.
 
(सौजन्य - 2011 जनगणना आणि प्यू रिसर्च सेंटर)
 
मुस्लिमांचा प्रजनन दर कमी; तरीही भारतात सर्वाधिक
भारतात अजूनही मुस्लिमांचा प्रजनन दर इतर धर्मीयांपेक्षा जास्त आहे. 2015 साली एका मुस्लीम स्त्रीला सरासरी 2.6 मुलं होती.
तर हिंदूंमध्ये हेच प्रमाण 2.1 इतकं होतं. तर सगळ्यात कमी प्रजनन दर जैन धर्मीयांमध्ये 1.2 इतका होता.
 
प्यू रिसर्च संस्थेच्या म्हणण्यानुसार, देशात हा कल सुरुवातीपासून असाच आहे. पण, यापूर्वी सर्व धर्मीयांमध्ये प्रजनन दर खूप जास्त होता.
 
1992 मध्ये मुस्लिमांमध्ये प्रजनन दर सर्वाधिक म्हणजे 4.4 होता. तर दुसऱ्या क्रमांकावर हिंदूंमध्ये तो 3.3 इतका होता.
 
याचाच अर्थ प्रजनन दरानुसार क्रमवारी बदलली नसली तरी सर्वच धर्मीयांमध्ये प्रजननाचं प्रमाण अलीकडे कमी झालं आहे.
 
प्यू रिसर्च सेंटरने असाही निष्कर्ष मांडला आहे की, देशातील अल्पसंख्यांक समाजामधील प्रजनन किंवा लोकसंख्या वाढीचा दर अलीकडच्या काळात कमी झाला आहे, जो पूर्वी हिंदूंपेक्षा कितीतरी जास्त होता.
 
25 वर्षांत पहिल्यांदा कमी झाला मुस्लीम धर्मीयांचा प्रजनन दर
प्यू रिसर्च सेंटरच्या ज्येष्ठ सामाजिक शास्त्रज्ञ आणि धर्मविषयक अभ्यासक स्टिफनी क्रेमर यांनी या संशोधनाविषयी एक खास निरीक्षण सांगितलं.
"मागच्या पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच मुस्लीम महिलांमधील प्रजनन दर कमी होऊन तो दोन मुलांपर्यंत खाली गेला आहे."
 
1990च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय महिलांचा प्रजनन दर सरासरी 3.4 इतका होता. 2015मध्ये तो 2.2 इतका झाला. आणि याच अवधीत मुस्लीम महिलांमध्ये प्रजननाचा दर इतरांच्या तुलनेत जास्त घटला आहे. 4.4 वरून तो 2.6 वर आला आहे.
 
मागच्या 60 वर्षांत भारतीय मुस्लिमांची लोकसंख्या तुलनेनं 4%नी वाढली आहे. तर हिंदूंची लोकसंख्या तुलनेनं 4%नी कमी झाली. इतर धर्मीयांची लोकसंख्येच्या टक्केवारीत फारसा बदल झालेला नाही.
 
याविषयी बीबीसीशी बोलताना स्टिफनी क्रेमर म्हणाल्या, "लोकसंख्येत झालेल्या या बदलांमुळे एक गोष्ट अधोरेखित होते की, याआधीच्या काळात, भारतात, मुस्लीम स्त्रिया इतर धर्मीयांच्या तुलनेत जास्त मुलांना जन्म देत होत्या."
 
पण, प्रजनन दरामध्ये झालेली ही घट फक्त धर्माशी संबंधित असेल असं नाही. कारण, कुटुंबाचा आकार ठरवण्यात धर्माबरोबरच इतर अनेक कारणं असतात.
 
त्याचबरोबर प्यू रिसर्च सेंटरने हे ही स्पष्ट केलं आहे की, भारतात कुटुंबाचा आकार कमी होणं किंवा धार्मिक लोकसंख्येत होणारे बदल हे धर्मांतराशी निगडित नाही आहेत. इतर देशांमध्ये धर्मांतर हे प्रमुख कारण असतं.
 
देशातील धर्मावर आधारित लोकसंख्येत झालेले बदल कशामुळे?
प्यू रिसर्च संस्थेनं केलेल्या संशोधनानुसार, मागच्या काही दशकांमध्ये देशाच्या लोकसंख्येत झालेले हे बदल प्रजनन दरात झालेल्या बदलांमुळेच झाले आहेत.
तर लोकसंख्या वाढीचं मुख्य कारण तरुण लोकसंख्येत आहे. तरुणांची संख्या जास्त असल्यामुळे लहान वयात लग्न होऊन महिलांमध्ये प्रजनन दरही वाढतो. त्यामुळे लोकसंख्या वाढते.
 
2020मध्ये हिंदूंचं सरासरी वय 29, मुस्लिमांचं 24 आणि ख्रिस्त धर्मीयांचं सरासरी वय 31 वर्षं होतं.
 
महिलांमध्ये शिक्षणाचं प्रमाण हा आणखी एक मुद्दा धर्मविषयक लोकसंख्येचं प्रमाण ठरवतो.
 
उच्चशिक्षित महिला उशिरा लग्न करतात आणि त्यांना कमी मूलं होण्याची शक्यता जास्त असते. तसंच संतती नियमनाविषयी त्या जागरुक असतात आणि शिक्षितही.
 
त्याचबरोबर कुटुंबाचा आर्थिक स्तरही यासाठी कारणीभूत असतो. गरीब मुलींचं लग्न श्रीमंत मुलींच्या तुलनेत लवकर होतं. आणि त्यांची मुलंही जास्त असतात. (मुलं जास्त असतील तर ती घरकामात आणि कमाईतही मदत करू शकतात.)
 
प्यू रिसर्च सेंटरनं केलेल्या या संशोधनातून काही धक्कादायक निष्कर्ष निघालेले नाहीत. बरीचशी निरीक्षणं अपेक्षित होती. कारण, अलीकडच्या काही दशकांत भारतीय महिलांच्या प्रजनन दरामध्ये घट झाल्याचे आणखी काही निष्कर्ष समोर आले होते.
 
एक भारतीय महिला आपल्या आयुष्यात सरासरी 2.2 मुलांना जन्म देते. अमेरिका(1.6) सारख्या विकसित देशापेक्षा हे प्रमाण जास्त आहे. पण, यापूर्वी 1992 (3.4) आणि 1950 (5.9) या काळात देशात असलेल्या प्रजनन दराच्या तुलनेत आताचा दर खूपच खाली आला आहे.
 
धर्म न मानणारे लोक अत्यल्प
या संशोधनातून आणखी एक गोष्ट समोर येते. भारतात कुठलाही धर्म न मानणाऱ्या लोकांची संख्या अत्यल्प आहे.
 
जागतिक स्तरावर ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्म मानणाऱ्या लोकांच्या खालोखाल कुठलाही धर्म न मानणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
 
स्टिफनी क्रेचर यांच्या मते, इतक्या खंडप्राय देशात धर्म न मानणाऱ्या लोकांची संख्या नगण्य असावी हे एक आश्चर्यकारक निरीक्षण आहे.
 
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक धर्मीयांची सर्वांत जास्त लोकसंख्या ही भारतात आहे. म्हणजे जगातील सर्वाधिक 94% हिंदू भारतात राहतात. तसंच जगातले सर्वाधिक जैन धर्मीय लोकही भारतातच राहतात. आणि विशेष म्हणजे जगातले 90% शीख लोक भारतात आणि एकट्या पंजाब राज्यात राहतात.
 
जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनशी तुलना करायची झाली तर चीनमध्ये जगातील अर्धे बौद्ध धर्मीय लोक राहतात.
 
तर कुठलाही धर्म न मानणाऱ्यांची संख्याही चीनमध्ये खूप जास्त आहे. पण, सगळ्यांत जास्त लोकसंख्या असलेला देश असूनही चीनमध्ये एकाही धर्माचे 90%च्या वर लोक राहत नाहीत.
 
याविषयी स्टिफनी क्रेमर म्हणतात, "जगभरात असा दुसरा देश नाही जिथे धार्मिक लोकसंख्येची इतकी वैशिष्ट्यं ठासून भरली आहेत. आणि त्यांची लोकसंख्याही जास्त आहे."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती