1285 कोटी रुपयांच्या आयफोन तस्करीचा पर्दाफाश,आरोपी ताब्यात
रविवार, 27 ऑक्टोबर 2024 (10:48 IST)
केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) विभागाने दिल्लीत 1,285 कोटी रुपयांच्या आयफोनची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
या टोळीचे दुबई आणि हवाला लिंक जोडले जात आहेत. आरोपींनी दुबईसह इतर अनेक देशांतून आयफोन आणि इतर महागड्या वस्तूंची तस्करी करून जीएसटीशिवाय त्यांची विक्री केली. याप्रकरणी मुख्य आरोपी कपिल अरोरा याला अटक करण्यात आली आहे. तसेच 2.18 कोटी रुपये वसूल करण्यात आले.
CGST ने या प्रकरणी कपिल अरोरा यांच्या गफ्फार मार्केट, दिल्लीतील करोल बाग येथील कार्यालय आणि पूर्व पटेल नगर येथील घरावर छापे टाकले. कार्यालयातून 13 लाख रुपये आणि पत्नी गरिमा अरोरा यांच्या घरातून 2.05 कोटी रुपये जप्त करण्यात आले.
कपिलच्या अरोरा कम्युनिकेशन आणि सेलफोन बदलो या दोन कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या नावाखाली तो दुबई आणि चीनमधून आयफोनची तस्करी करत होता. हे फोन बेकायदेशीरपणे आणि जीएसटीशिवाय विकले जात होते.