इंदूरमध्ये मराठी- हिंदी भाषावाद मिटवण्याचा प्रयत्न

इंदूरमध्ये गेल्या ८ एप्रिल रोजी पुण्याच्या चपराक प्रकाशनतर्फे प्रकाशित, सुधीर बेलसरे यांची हिंदी कादंबरी, 'लवकुश' व महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध हिंदी मराठी लेखिका व कवियत्री चंद्रलेखा बेलसरे यांच्या हिंदी काव्यसंग्रह, 'अभिजात' या दोन हिंदी पुस्तकांचे विमोचन एका दिमागदार सोहळ्यात संपन्न झाले. 
मध्यभारत हिंदी साहित्य समिती, इंदूर, लिवा क्लब इंदूर, आणि चपराक प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाची अध्यक्षता मध्यभारत हिंदी साहित्य समितीचे साहित्यमंत्री व प्रसिद्ध साहित्यिक श्री हरेराम बाजपेयी यांनी केली व प्रमुख अतिथी मराठी साहित्य अकादमी, भोपाळचे निदेशक श्री अश्विन खरे हे होते. विशेष अतिथी हिंदीचे प्रसिद्ध साहित्यिक श्री सुर्यकांत नागर हे होते. कार्यक्रमात चपराक प्रकाशनचे मालक व संपादक श्री घनश्याम पाटील, मराठीचे प्रसिद्ध कादंबरीकार श्री भारत सासणे, हिंदीचे प्रसिद्ध साहित्यिक डॉ. मोहन बांडे व लिवा क्लब इंदूरचे श्री विश्वनाथ शिरढोणकर इत्यादि मान्यवर देखील उपस्थित होते. 
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिलीप शोपुरकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकेत इंदूरमध्ये विमोचनाच्या कार्यक्रमाचे कारण सांगताना श्री घनश्याम पाटील म्हणाले की चपराक प्रकाशन आता हिंदी प्रकाशनाकडे वळत असून आमचे मानस पुणे येथून एक हिदी त्रैमासिक काढण्याचे आहे. म्हणून या कार्यक्रमासाठी मध्यप्रदेशच्या इंदूरची आम्ही निवड केली. येथे मराठी आणि हिंदी भाषिक साहित्य रसिकांची योग्य ती दखल घेत साहित्यिक व सांस्कृतिक प्रवाहाने दोन प्रांत व दोन भाषिक आणखीनच जवळ येतील असा प्रयत्न आम्ही करू. 
 
मराठी साहित्य अकादमी भोपाळचे निदेशक श्री अश्विन खरे म्हणाले की मध्यप्रदेशच्या मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीसाठी महाराष्ट्राचा देखील सिंहाचा वाटा असायला हवा. आम्हाला हे विसरून चालणार नाही की इथल्या मराठी भाषिकांची नाळ महाराष्ट्राशी जुळलेली आहे. मध्यप्रदेशात फार मोठ्या प्रमाणात मराठी माणूस राहतो. इंदूरमध्येच १० लक्ष पेक्षा जास्त मराठी लोकसंख्या आहे. म्हणून चपराक प्रकाशनच्या घनश्याम पाटीलचे इंदूरकरांसाठी प्रदर्शित या आपुलकीचे नक्कीच कौतुक करायला हवे. यामुळे अनेकांना साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध होईल अशी आम्ही अपेक्षा करतो.
 
लिवा क्लबच्या विश्वनाथ शिरढोणकरांनी लिवाक्लब, इंदूर द्वारे मराठी भाषिकांसाठी करत असलेल्या कार्याची सर्वांना माहिती दिली. मराठीचे प्रसिद्ध कादंबरीकार श्री भारत सासणे यांनी असल्या कार्यक्रमांचे समाजाच्या जडणघडणात अत्यंत महत्व असते असे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय संम्बोधनात श्री हरेराम बाजपेयी म्हणाले की मराठी व हिंदी या दोन्ही भाषांची लिपी देवनागरी असल्याने दोन्ही भाषांमध्ये कोणताही वाद नाही. याचप्रमाणे जर का सर्वच भारतीय भाषांची लिपी देवनागरी ठेवली तर भाषांचे वाद संपून त्यांच्यात समरसता वाढेल. यासाठी त्यांनी भाषांतराच्या कार्याची गरज असल्याचे सांगितले. 
 
कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात पुणे व इंदूरच्या कवींचे प्रसिद्ध हिंदी कवी श्री चंद्रसेन विराट यांच्या अध्यक्षतेत कवी संमेलन रंगले. यात चंद्रसेन विराट, श्रीती राशिनकर, प्रमोद बेलसरे, हरेराम वाजपेयी, प्रभू त्रिवेदी, सदशिव कौतुक, संदीप राशिनकर, रंजना फातेह्पुरकर, अशोक द्विवेदी, रामचंद्र अवस्थी, डॉ.पद्मा सिंह, चंद्रभान भारद्वाज, प्रदीप नवीन, दिलीप शोपुरकर, अतुल केकरे,  यांनी आपापल्या कवितांचे वाचन केले. काव्यसंमेलनाचे सूत्र संचालन श्रीती राशिनकर यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. संध्या बेलसरे यांनी केले.
 
तसेच दुसर्‍या दिवशी पुणेकर आणि इंदूरकरांच्या अप्रतिम मराठी कवितांचा आगळावेगळा छान असा कार्यक्रम रंगला. कवी संमेलनाची अध्यक्षता नवीमुंबईचे, मराठीचे प्रसिध्द गजलकार ए.के.शेख यांनी केली. प्रमुख अतिथी होते चपराक प्रकाशन पुणेचे संपादक श्री घनश्याम पाटील. विशेष अतिथी होते मराठीचे प्रसिध्द कादंबरीकार श्री भारत सासणे. कव‍ी संमेलनाचे सूत्र संचालन डॉ. श्रीकांत तारे यांनी केले. मराठी साहित्य अकादमी, भोपाळचे निदेशक श्री अश्विन खरे यांनी बाहेरहून आलेल्या सर्व पाहुण्यांचे श्री सर्वोत्तमचा गुडीपाडवा अंक भेट देऊन स्वागत केले, तर श्री घनश्याम पाटील यानी मराठी कवींसकट आलेल्या सर्वच श्रोत्यांना साहित्य चपराकचा एप्रिल अंक भेट केला.
 
कवी संमेलनात पुणेचे कवी, माधव गिर, समीर नेर्लेकर, विनोद पंचभाई, चंद्रलेखा बेलसरे व सरिता कमळापुरकर यांच्या कवितांना रसिकांनी कौतुक मिळविले. चांदवड, नाशिकहून आलेले संदीप गुजराथी यांनीसुद्धा आपल्या कवितेने रसिकांचे कौतुक मिळविले. इंदूरच्या कवींमध्ये, सुषमा अवधूत, गजानन तपस्वी, राधिका इंगळे, शोभा तेलंग,चेतन फडणीस, दिलीप शोपुरकर, अरुणाताई खरगोणकर, मनीष खरगोणकर, डॉ.श्रीकांत तारे आणि विश्वनाथ शिरढोणकर यांनी आपल्या कवितांमुळे रसिकांची भरभरून दाद मिळविली.
 
कार्यक्रमाच्या शेवटी कवी संमेलनाचे अध्यक्ष ए.के.शेख यांनी फार सुंदर पद्धतीने गजल काय असते आणि ती कशी लिहावी यावर आपले मत मांडले. आणि अनेक गजल ऐकवित रसिकांना भारावून टाकले. पुणेचे उद्योगपती श्री प्रमोद बेलसरे यांनी आभार प्रदर्शन केले.
 

वेबदुनिया वर वाचा