कर्जबाजारी मजूर रातोरात झाला लखपती; खाणीत सापडला 80 लाखांचा हिरा

शुक्रवार, 26 जुलै 2024 (14:59 IST)
मध्य प्रदेशातील एक मजूर रात्रीतून मालामाल झाला आहे. राजू गोंड नावाच्या या मजुरानं पन्ना जिल्ह्यात लीजवर घेतलेल्या एका खाणीतून एक मोठा हिरा शोधून काढला आहे.

सरकारी लिलावात 19.22 कॅरेटच्या या हिऱ्याची विक्री जवळपास 80 लाख रुपयांत करण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षांपासून पन्नामधील खाणी अशाप्रकारे भाड्याने घेत असल्याचं राजू गोंड यांनी सांगितलं आहे.
पन्ना हा परिसरा हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक लोक सरकारकडून खाणी भाड्याने घेऊन त्यात हिरे शोधण्याचा प्रयत्न करत असतात.केंद्र सरकार नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएमडीसी) च्या माध्यमातून पन्नामध्ये एक मेकेनाइज्ड डायमंड मायनिंग प्रोजेक्ट चालवतं.
 
एनएमडीसीकडून व्यक्ती, कुटुंब आणि सहकारी संस्थांना खाणी भाडे तत्वावर दिल्या जातात. हे लोक लहानसहान अवजारं आणि उपकरणांच्या मदतीनं हिरे शोधण्याचा प्रयत्न करतात.
या लोकांना जे काही सापडेल ते सरकारी डायमंड ऑफिसमध्ये जमा करावं लागतं. हे कार्यालय त्या हिऱ्याची किंमत ठरवतं.

भाडेतत्वावर मिळतात खाणी
मध्य प्रदेश सरकारचे अधिकारी असलेले अनुपम सिंह बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले की, “या खाणी ठराविक कालावधीसाठी 200-250 रुपये भाडे तत्वावर दिल्या जातात.”
2018 मध्ये बुंदेलखंडमधील एका मजुराला पन्नामध्येच 1.5 कोटींचा हिरा मिळाला होता, तसं पाहता एवढे महागडे हिरे सहजासहजी सापडत नाहीत.
अनुपम सिंह यांच्या मते, अनेक लोकांना वरचेवर लहान-सहान आकाराचे हिरे सापडत असतात. पण गोंड यांना मिळालेल्या हिऱ्याच्या आकारामुळं त्याची चर्चा होत आहे.
राजू गोंड यांनी बीबीसी बरोबर बोलताना सांगितलं की, त्यांच्या वडिलांना पन्नाच्या जवळ असलेल्या कृष्णा कल्याणपूर पट्टी गावात दोन महिन्यांपूर्वी एक खाणी भाड्यानं घेतली होती.
राजू म्हणाले की, पावसाळ्यात शेतांमध्ये काही काम नसतं. त्यामुळं त्याचं कुटुंब खाणी भाड्यानं घेऊन त्यात हिरे शोधण्याचं काम करतं."आम्ही गरीब लोक आहोत. आमच्याकडे उत्पन्नाचा दुसरा मार्ग नाही. त्यामुळं आम्ही या मार्गाने काही मिळवण्याचा प्रयत्न करतो.”राजू यांनी लोकांना मौल्यवान हिरे सापडल्याचे अनेक किस्से ऐकले होते. त्यांनाही एकदिवस नक्कीच मौल्यवान हिरे मिळतील, अशी आशा होती.
 
कसा सापडला हिरा?
बुधवारी सकाळी राजू नित्यक्रमानुसार भाड्याने घेतलेल्या खाणीमध्ये कामासाठी पोहोचले.
कामाबाबत सांगताना राजू गोंड म्हणाले की, "हे फार मेहनतीचं काम आहे. आम्ही खड्डा खोदतो, माती दगड बाहेर काढतो. ते चाळणीने चाळतो आणि अत्यंत काळजीपूर्वक त्या लहान लहान दगडांमध्ये हिरे शोधण्याचा प्रयत्न करतो.”
बुधवारी दुपारी काम करत असताना मेहनतीचं फळ त्यांना मिळालं."मी दगड धुवून स्वच्छ करत होतो तेव्हाच काचेसारखा दिसणारा एक दगड दिसला. मी तो उचलला आणि डोळ्यासमोर पडला. मला त्यातून थोडा प्रकाश येताना दिसला. त्यावेळी मला हिरा सापडल्याची जाणीव झाली,” असं राजू म्हणाले.
 
मुलांचे शिक्षण आणि घराचे स्वप्न
राजू गोंड त्यांना सापडलेला हिरा घेऊन सरकारी डायमंड ऑफिसमध्ये गेले. त्याठिकाणी या हिऱ्याचं वजन करून त्याचं मूल्य काढण्यात आलं.
 
अनुपम सिंह म्हणाले की, हिऱ्यासाठी पुढच्या सरकारी लिलावात बोली लावली जाईल. हिऱ्यावरील सरकारी रॉयल्टी आणि कराची रक्कम कपात केल्यानंतर उर्वरित रक्कम राजू गोंड यांना दिली जाईल, असंही ते म्हणाले.
हिरा विकल्यानंतर मिळालेल्या रकमेतून कुटुंबासाठी घर तयार करण्याची आणि मुलांना चांगलं शिक्षण देण्याची राजू गोंड यांची इच्छा आहे.
पण सर्वात आधी त्यांना कर्जाचे पाच लाख रुपये फेडायचे आहेत.
 
त्यांना मिळणाऱ्या एवढ्या मोठ्या रकमेबाबत लोकांना समजेल याची चिंता राजू यांना नाही. ते मिळणाऱ्या रकमेचं त्यांच्याबरोबर राहणाऱ्या 19 जणांना वाटप करणार आहेत. एक मोठी रक्कम मिळणार असल्याचाच त्यांना आनंद आहे.
शेवटी राजू गोंड म्हणाले की, “मी उद्या पुन्हा त्याच खाणीमध्ये काम करण्यासाठी जाईल आणि पुन्हा हिऱ्याचा शोध सुरू करेल.”
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती