पुन्हा एकदा वैद्यकीय पदवी शुल्कात वाढ

सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (09:33 IST)
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांचे मुळातच वर्षांला लाखाच्या घरात पोहोचलेले शुल्क यंदाही दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले आहे. अनेक महाविद्यालयांना सलग दुसऱ्या वर्षी साठ हजार ते दोन लाख रुपयांची शुल्कवाढ मंजूर करण्यात आली आहे.शासकीय महाविद्यालयांत मोजक्या जागा आणि खासगी महाविद्यालयांचे भरमसाट शुल्क या कचाटय़ातून यंदाही विद्यार्थ्यांची सुटका झालेली नाही. गेल्या तीन वर्षांत बहुतेक खासगी महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांचे शुल्क हे दुपटीने वाढले आहे. यंदाही गेल्या वर्षीच्या तुलनेत पदवी अभ्यासक्रमांचे शुल्क पुन्हा एकदा दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले आहे. अनेक महाविद्यालयांना सलग दुसऱ्या वर्षी साठ हजार ते अडीच लाख रुपयांची शुल्कवाढ प्राधिकरणाने मंजूर केली आहे.सध्या वर्षांला किमान पाच लाख रुपये ते अठरा लाख रुपये खासगी महाविद्यालयांचे शुल्क आहे. मुंबईतील सोमय्या महाविद्यालय, पुण्यातील नवले महाविद्यालय, नागपूर येथील साळवे महाविद्यालय, सोलापूर येथील अश्विनी महाविद्यालय या सगळ्या महाविद्यालयांचे शुल्क सलग दुसऱ्या वर्षी वाढले आहे.
 
डॉक्टर होण्याचा खर्च ३५ लाखांहून अधिक..
महाविद्यालयांचे शुल्क हे त्यांच्या खर्चावर आधारित असते. महाविद्यालयांच्या आवाजवी शुल्कवाढीला आळा घालण्यासाठी शुल्क नियमन प्राधिकरण नेमण्यात आले. संस्थेने त्यांना येणारा खर्च दाखवून त्यानुसार शुल्कवाढीचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे द्यायचा असतो. मात्र, प्रत्यक्षात दरवर्षी वाढीव खर्च दाखवून प्राधिकरणाकडून शुल्कवाढ मंजूर करून घेण्यात येते. प्राधिकरणाने मंजूर केलेल्या शुल्काशिवाय इतरही अनेक खर्च विद्यार्थ्यांच्या माथी मारण्यात येतात. नियमात बसत नसताना दोन ते पाच लाख अनामत रक्कम महाविद्यालये मागतात. त्याशिवाय वसतिगृहाचे शुल्क घेण्यात येते. सर्व मिळून डॉक्टर होण्याचा एकूण खर्च हा सध्या ३५ लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती