केरळच्या डोंगराळ जिल्ह्यात इडुक्की येथे शनिवारी रात्री भूस्खलनाने प्रचंड हाहाकार माजवला. या अपघातात 48 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना आदिमालीच्या मन्नमकंदम भागात घडली, जिथे राष्ट्रीय महामार्ग एनएच-85 वर रुंदीकरणाचे काम सुरू असताना डोंगरावरील माती कोसळली आणि त्यात किमान आठ घरे जमीनदोस्त झाली.
मृत व्यक्तीचे नाव बिजू (48) असे आहे. लक्ष्मवीडू उन्नती येथील रहिवासी आहे. त्यांची पत्नी संध्या जखमी असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री 10:30 च्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलनीत एकूण 22 घरे होती. दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे शनिवारी संध्याकाळी सर्व कुटुंबांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले. तथापि, बिजू आणि संध्या काही आवश्यक वस्तू आणि अन्न तयार करण्यासाठी रात्री घरी परतले. आदिमाली ब्लॉक पंचायत सदस्य कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, ते घरात असताना रात्री10:30 च्या सुमारास डोंगरावर दरड कोसळली आणि आठ घरे पूर्णपणे गाडली गेली.
स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना आणि अग्निशमन आणि बचाव सेवेला माहिती दिली, ज्यामुळे पाच तास बचावकार्य सुरू राहिले. बिजू आणि संध्या यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले, परंतु वाटेतच बिजूचा मृत्यू झाला. कृष्णमूर्ती म्हणाले की, संध्या यांना सुरुवातीला आदिमाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर अलुवा येथे हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.