भारतीय गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे 5 लाख माणसांचा मृत्यू कसा झाला?
शनिवार, 27 जुलै 2024 (09:28 IST)
एकेकाळी गिधाडं ही भारतात विपुल प्रमाणात आढळत असत.
हे पक्षी कायम सावज शोधत असतात. एखाद्या शेतात प्राण्याचा मृतदेह ते शोधताना दिसतात तर कधी विमान टेक ऑफ होताना ते जेट इंजिनमध्ये अडकतात आणि पायलटला इशारा देतात.
मात्र, गेल्या दोन दशकांपासून आजारी गायींवर उपचार करण्यासाठी जे औषध वापरलं जातं, त्यामुळे अनेक गिधाडांचा मृत्यू झाला आहे.
1990 च्या दशकातील मध्यापर्यंत गिधाडांची संख्या 5 कोटी होती. ती आता अगदी शून्यावर येऊन ठेपली आहे. डायक्लोफिनॅक या औषधामुळे हे मृत्यू होत आहेत.
हे औषध म्हणजे गायींसाठी वेदनाशामक औषध आहे आणि गिधाडांसाठी अतिशय धोकादायक आहे.
गिधाड पक्षी प्राण्यांच्या कुजलेल्या मृतदेहावर जगतात. जर एखाद्या प्राण्याला डायक्लोफिनॅक हे औषध दिलं असेल आणि ते गिधाडाच्या पोटात गेलं तर त्याची किडनी निकामी होते आणि त्याचा मृत्यू होतो.
2006 पासून या औषधावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे काही भागात मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र, काही प्रजातींमध्ये 91-98 टक्के नुकसान झालं आहे, असं स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्सच्या ताज्या अहवालात म्हटलं आहे.
आणि हे इतकंच नाही. आणखी एका अभ्यासाअंती असं समोर आलं आहे की, या गिधाडांच्या मृत्यूमुळे धोकादायक जीवाणूंना मोकळं रान मिळालं आणि त्यामुळे अनेक प्रकारचे संसर्ग होताहेत. या कारणामुळे 5 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन या मासिकात प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सांगण्यात आलं आहे.
“गिधाडं ही निसर्गाचे स्वच्छतादूत समजले जातात. कारण ते मेलेल्या जनावरांना नष्ट करण्याचं काम करतात. त्यांच्यात पर्यावरणात रोगराई पसरवणारे अनेक जीवाणू असतात. त्यामुळे गिधाडं नसले की रोगराई पसरते,” असं या शोधनिबंधाचे सहलेखक इयाल फ्रँक म्हणतात. ते शिकागो विद्यापीठातील हॅरिस स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीमध्ये प्राध्यापक आहेत.
“माणसांच्या आयुष्यात गिधाडांचं महत्त्व काय आहे समजून घेतल्यामुळे वन्यजीव वाचवणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. ते फक्त दिसायला गोड नसतात. आपल्या पर्यावरणात त्यांचं काहीतरी कर्तव्य आहे आणि त्याचा थेट संबंध आपल्याशी आहे.”
फ्रँक आणि त्यांचे सहकारी अनंत सुदर्शन यांनी गिधाडं असलेलल्या भारतातल्या काही जिल्ह्यातील मृत्यूंची तुलना ऐतिहासिकदृष्ट्या कमी गिधाडं असलेल्या लोकसंख्येशी केली. ही तुलना गिधाडं जिवंत असताना आणि नसताना अशी केली. त्यांनी रेबिजच्या लशीच्या विक्रीदरचाही अभ्यास केला. तसंच, पाण्यात रोगजंतू आणि भटक्या कुत्र्यांच्या संख्येचंही अवलोकन केलं.
त्यांच्या असं लक्षात आलं की, वेदनाशामक औषधांची विक्री वाढली आणि गिधाडांची संख्या कमी झाली आहे. ज्या जिल्ह्यात हे पक्षी रहायचे त्या जिल्ह्यात मृत्यूदर चार टक्क्यांनी वाढला आहे.
शहरात गुरांची संख्या जास्त असते त्यामुळे त्यांना पुरण्याचा दरही जास्त असतो. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम शहरात राहणाऱ्या माणसांवर सर्वाधिक झाला आहे.
संशोधकांच्या मते 2000 ते 2005 या काळात गिधाडांच्या मृत्युमुळे 100,000 अतिरिक्त माणसांचे मृत्यू झाले. या मृत्युंमुळे आणि एकूणच मुदतपूर्व मृत्युंमुळे 69 बिलियन डॉलरचं नुकसान झालं आहे.
हे मृत्यू जीवाणू आणि रोगराई पसरल्यामुळे ढाले आहेत. ते कदाचित गिधाडं असताना टळले असते.
उदाहरणार्थ गिधाडं नसल्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आणि यामुळे रेबिजचं प्रमाण लक्षणीय वाढलं.
त्या काळात रेबिजच्या लसी कमी पडल्या. एखादी सडकी वस्तू स्वच्छ करण्याचं काम कुत्रे गिधाडांइतकं परिणामकारक पद्धतीने करत नाहीत. त्यामुळे विल्हेवाट चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे रोगजंतू आणि जीवाणू पिण्याच्या पाण्यात जातात. पाण्यातील फिकल बॅक्टेरियाची संख्या (विष्ठेवरचे जीवाणू) दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे.
“गिधाडं मेल्यामुळे अपिरिमित नुकसान काय असतं याचं उदाहरण भारतात ठळकपणे बघायला मिळतं आहे. ही प्रजाती नष्ट झाल्यामुळे माणसाला अतिशय जास्त प्रमाणात नुकसान सोसावं लागणार आहे.” असं सुदर्शन म्हणाले. ते या शोध निबंधाचे सहलेखक आहेत आणि वॅरविक विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
“हे सगळं नवीन रसायनांमुळे झालं आहेच पण माणसांचाही त्यात दोष आहे. प्राण्यांचा अधिवास नष्ट होतोय, वन्यजीवांचा व्यापार होतोय, आणि हवामान बदल. याचा परिणाम प्राण्यांवर आणि पर्यायाने आपल्यावर झाला आहे. हे सगळं नीट समजून घेतलं पाहिजे. अशा महत्त्वाच्या प्रजातीचं संवर्धन करण्यासाठी काहीतरी नियमन करायला हवं.” ते म्हणाले.
भारतात ज्या गिधाडांच्या ज्या प्रजाती आहेत त्यापैकी पांढऱ्या पुठ्ठ्याचं गिधाड, भारतीय गिधाड, आणि लाल डोक्याचं गिधाड यांचं 2000 च्या दशकात सर्वाधिक नुकसान झालं आहे. त्यांचं प्रमाण अनुक्रमे 98%, 95% आणि 91% नी कमी झालं आहे. इजिप्शियन गिझाड आमि ग्रिफन गिधाड यांची संख्या प्रचंड रोडावली आहे. पण ही घट खूप धोकादायक नाही.
2019 मध्ये भारतात पशुपक्ष्यांची संख्या मोजली तेव्हा 50 कोटी होती. ही जगात सर्वाधिक संख्या आहे. गिधाडं ही एक प्रकारची स्वच्छतादूत असतात.
मृत प्राण्यांच्या विल्हेलवाट लागण्यासाठी शेतकरी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. संशोधकांच्या मते प्रवासी कबुतर किंवा जंगली कबुतर जेव्हा अमेरिकेत लोप पावले त्यानंतर वेगाने लोप पावणाऱ्या प्रजातीत गिधाडांचा समावेश झाला आहे. भारतात तर ते अतिशय वेगाने लोप पावले आहेत.
भारतात आता जितकी गिधाडं उरली आहेत ते एका सुरक्षित भागात आहेत. त्यांचा आहार आता कुजलेल्या प्राण्यांपेक्षा मेलेले वन्यजीव आहे, असं स्टेट ऑफ इंडियन बर्ड्सच्या अहवालात म्हटलं आहे.
गिधाडांची कमी होणारी लोकसंख्या ही गिधाडांसाठी धोक्याची घंटा आहेच, मात्र त्याचा माणसावर झालेला नकारात्मक परिणाम ही आणखी एक धोक्याची घंटा आहे.
प्राण्यांना दिलेल्या जाणाऱ्या औषधाचा गिधाडांना धोका आहे, असा इशारा तज्ज्ञ देतात. आता प्राणी मोठ्या संख्येने प्राणी पुरले जातात आणि भटक्या कुत्र्यांशी स्पर्धा यामुळे कुजलेल्या मृतदेहांची संख्या कमी झाली आहे.
त्यामुळे गिधाडांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. वाळू उपसा आणि खाणकाम यामुळे गिधाडांच्या अधिवासावर गदा आली आहे.
गिधाडं परत येतील का? हे सांगणं कठीण आहे. काही आश्वासक चिन्हं आहेत खरंतर. गेल्या वर्षी 20 गिधाडांची एक विशिष्ट वातावरणात वाढ करण्यात आली. त्यांना सॅटलाईट टॅग्स लावण्यात आले आणि त्यांचा बचाव करण्यात आला.
त्यांना पश्चिम बंगालमधील व्याग्र प्रकल्पातून सोडून देण्यात आलं. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात दक्षिण भारतात 300 गिधाडं असल्याची नोंद करण्यात आली. पण याबाबतीत आणखी काहीतरी ठोस कारवाई होण्याची गरज आहे.