गुजरातमधील मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्यांच्या मतदानोत्तर सर्वेक्षणांचे (एक्झिट पोल) अंदाज आले आहेत. या सर्व एक्झिट पोलमधून गुजरातेत भाजपाच पुन्हा एकवार मोठ्या बहुमताने सत्तेवर येईल आणि हिमाचल प्रदेशमध्येही हा पक्ष काँग्रेसकडून सत्ता हिरावून घेईल, असे एकमत झाले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये सोमवार, १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान झाले, तर हिमाचल प्रदेशात एक महिन्यापूर्वी मतदान झाले होते.
दोन्ही राज्यांमध्ये घेतलेल्या एक्झिट पोलचे निष्कर्ष वृत्तवाहिन्यांनी जाहीर केले. त्यांच्या निष्कर्षात भाजपा व काँग्रेस या दोन पक्षांना मिळू शकणा-या जागांबाबत एकमत नसले, तरी गुजरातमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता येईल आणि हिमाचल प्रदेशात सत्तांतर होऊन आणखी एक काँग्रेसशासित राज्य भाजपाच्या झोळीत जाईल, यावर या सर्वांमध्ये एकवाक्यता दाखवली आहे.