राजधानी दिल्लीला चौथ्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या आहेत. शालीमार बागेतून आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीतील रामलीलामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत ६ चेहरेही कॅबिनेट मंत्री होणार आहेत. दिल्ली मंत्रिमंडळात प्रवेश वर्मा (नवी दिल्ली), मनजिंदर सिंग सिरसा (राजौरी गार्डन), रविंदर कुमार इंदेराज (बवाना), कपिल मिश्रा (करवल नगर), आशिष सूद (जनकपुरी) आणि पंकज कुमार सिंग (विकासपुरी) यांना मंत्री करण्यात आले आहे.
कार्यक्रमात कोण कोण उपस्थित आहेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा, चंद्राबाबू नायडू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, उत्तर प्रदेशचे दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील समारंभाला उपस्थित राहिले.
रेखा गुप्ता कोण आहेत?
सुमारे दहा वर्षे एबीव्हीपीच्या सदस्या राहिल्यानंतर, त्या २००२ मध्ये भाजपमध्ये सामील झाल्या. त्या दिल्ली भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील राहिल्या आहेत. रेखा गुप्ता या एक अनुभवी नगरसेवक राहिल्या आहेत. त्यांनी शालीमार बाग येथील आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा २९,५९५ मतांनी पराभव केला.