डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांवरून भाजप आणि आपमध्ये वाद का सुरू आहे?

मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (22:55 IST)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञा सध्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. दिल्लीमध्ये एका धर्मांतरणाच्या कार्यक्रमात या 22 प्रतिज्ञांचा पुनरुच्चार केला गेला. त्यातल्या आपण हिंदू देवीदेवतांची पूजा करणार नाही, उपासना करणार अशा आशयाच्या प्रतिज्ञेवरून भाजप आणि आम आम आदमी पक्षामध्ये राजकारण तापलं आहे.
 
5 ऑक्टोबर 2022 च्या दिवशी दिल्लीत दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेतर्फे डॉ. आंबेडकर भवन इथे धर्मांतरणाच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमात सुमारे दहा हजार जणांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यावेळी आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञांचा पुनरुच्चार करण्यात आला.
 
आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्लीचे समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम त्यावेळी तिथे उपस्थित होते. या कार्यक्रमात मैदानात आणि स्टेजवरील सर्वांनीच त्यावेळी प्रतिज्ञा घेतली.
 
बाबासाहेबांचे चुलत पणतू आणि या संस्थेचे प्रमुख राजरत्न आंबेडकरही तिथे हजर होते.
 
राजेंद्र पाल गौतम शपथ घेतानचा हा व्हीडियो समोर आल्यावर भाजपच्या समर्थकांनी जोरदार टीका सुरू केली.
 
गुजरातमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदू देवीदेवता नाकारण्याचा हा मुद्दा वेगळाच राजकीय रंग घेऊ लागला.
भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ट्वीट केलं, की केजरीवाल यांचे मंत्री हिंदु देवदेवतांवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे केजरीवाल गुजरातमध्ये जय श्री कृष्णा म्हणत मतं मागत आहेत.
 
पण गौतम यांनी हे आरोप नाकारले आहेत आणि एक पत्रक जाहीर करून आपली बाजू मांडली. आपण सर्व धर्मियांच्या भावनांचा सन्मान करत असल्याचं स्पष्टीकरणही दिलंय, तसंच आंबेडकरांच्या या प्रतिज्ञांमागची भूमिका मांडली आहे.
 
वाद वाढू नये यासाठी राजेंद्र पाल गौतम यांनी मग दिल्लीच्या मंत्रिमंडळातून राजीनामाही दिला. गौतम यांना त्यानंतर पोलीसांनी नोटीस बजावली.
 
पण या सगळ्या प्रकाराच्या मुळाशी असलेल्या आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञांचा चुकीचा अर्थ घेतला जात असल्याची खंतही मांडली जाते आहे. मुळात या प्रतिज्ञा आल्या कुठून?
डॉ. आंबेडकरांनी कोणत्या 22 प्रतिज्ञा दिल्या?

14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमी इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांच्यासोबत जवळजवळ तीन लाख अनुयायांनीही बौद्ध धर्मात प्रवेश केला.
 
बाबासाहेबांनी तेव्हा या अनुयायांना बावीस प्रतिज्ञा किंवा बावीस शपथा घ्यायला लावल्या. यातल्या काही प्रतिज्ञांमध्ये आंबेडकरांनी मूर्तीपूजा किंवा देवी देवतांची उपासना नाकारली आहे.
 
आंबेडकरांनी दिलेल्या प्रतिज्ञा अशा आहेत:
 
मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
मी चोरी करणार नाही.
मी व्याभिचार करणार नाही.
मी खोटे बोलणार नाही.
मी दारू पिणार नाही.
ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
इतःपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
आंबेडकरांनी दिलेल्या या प्रतिज्ञा घेणं ही भारतात त्यानंतर बौद्ध धर्मात प्रवेश करतानाची एक प्रथाच बनली आहे.
 
आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा का दिल्या?
 
आंबेडकरांच्या या 22 प्रतिज्ञांमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जातात अशी ओरड होते आहे. पण आंबेडकरांनी दिलेल्या या शपथांमागचा उद्देश कुणाचा अपमान करण्याचा नव्हता, असं बौद्ध धम्माच्या अभ्यासक रुपा कुलकर्णी बोधी स्पष्ट करतात.
 
त्या म्हणतात, "या प्रतिज्ञा देणं म्हणजे गणपतीचा किंवा विष्णूचा अपमान करणं हे प्रयोजन नव्हतं. तर मूर्तीपूजा, कुलदेवता वगैरे मानणं, कर्मकांड, चमत्कारांच्या आहारी जाणं यातून त्यांना आपल्या समाजाला सोडवायचं होतं. बाबासाहेबांनी या सगळ्यांतला फोलपणा जाणला होता. त्यांना लोकांना एक चांगलं जीवन जगण्याचा मार्ग द्यायचा होता."
 
बौद्ध धम्माची पुस्तकं वाचणं, त्यातली प्राचीन भाषा समजणं सर्वांसाठी शक्य नाही, याची आंबेडकरांना जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या अनुयायांना धम्माचं पालन कसं करावं हे सोप्या शब्दांत सांगणाऱ्या या प्रतिज्ञा दिल्या.
 
ज्येष्ठ लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि दलित पँथरचे सहसंस्थापक अर्जुन डांगळे सांगतात की "लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारल्यावर पुन्हा जुन्या विचारांकडे वळणं बाबासाहेबांना मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी या प्रतिज्ञा दिल्या. आपण एक वेगळा जीवनमार्ग निवडतो आहे, हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. बौद्ध धम्माचा स्वीकार म्हणजे द्वेषावर आधारीत व्यवस्था नाकारणं हे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. बाबासाहेबांचा एकूण जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन लोकशाहीवादी, विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक होता."
 
"ज्या माणसांना इथल्या धर्मानं आणि व्यवस्थेनं माणूसपणाची वागणूक दिली नाही किंवा सत्ता,संपत्ती, प्रतिष्ठा दिली नाही, त्या माणसांना एक नवी ओळख देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. त्यामुळे त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करणं हे केवळ धर्मांतर नव्हतं, तर ती एक सामाजिक क्रांती होती. धर्माची मानसिक गुलामगिरी नाकारण्यासाठी या प्रतिज्ञा आहेत."
 
पण आंबेडकरांचा हा विचार बाजूला सारून धर्माच्या नावावर द्वेष पसरवला जातो आहे, अशी खंतही ते व्यक्त करतात.

Published By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती