आंध्र प्रदेशमध्ये फार्मा कंपनीत स्फोट, आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

गुरूवार, 22 ऑगस्ट 2024 (10:06 IST)
आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यातील अच्युतापुरम विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) परिसरातील एस्सेन्टिया अॅडव्हान्स सायन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या रिअॅक्टरमधअये स्फोट झाल्यानं इमारतीचा काही भाग कोसळला.
 
या स्फोटात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलंय.
 
एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झालीय.
 
स्फोटानंतर लागलेल्या आगीला विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्याही दाखल झाल्या आहेत.
 
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. स्फोटातील मृतांच्या संख्येबाबत त्यांनीच माहिती दिली.
 
पवन कल्याण यांच्या माहितीपूर्वी अनाकापल्ली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजया कृष्णन यांनीही या दुर्घटनेबाबत माहिती दिली होती.
 
या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. दुर्घटनेची तीव्रता लक्षात घेता, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.
 
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना दुपारच्या वेळेस झाली असून, त्यावेळी अनेक कर्मचाऱ्यांच्या जेवणाची वेळ होती. स्फोटानंतर सर्वत्र धुराचं साम्राज्य निर्माण झालं.
 
स्फोटानंतर इमारतीचा भाग कोसळला. या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक कर्मचारी दबले असण्याची भीती व्यक्त केली जातेय.
 
स्फोटाच्या दुर्घटनेवेळी फॅक्टरीमध्ये 300 हून अधिक लोक हजर होते.
 
अनाकापल्ली जिल्ह्यात सुमारे 10 हजार एकरांवर विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) पसरलेले आहे. यापैकी तीन हजार एकर जमीन फार्मा कारखान्यांसाठी आहे.
 
या भागाला अच्युतपुरम फार्मा एसईझेड म्हणतात.

Published By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती