भाजपचा विजय विकासामुळे नव्हे - राजीव सातव

बुधवार, 20 डिसेंबर 2017 (09:22 IST)
गुजरातच्या नागरिकांना गुजरातच्या विकासाची माहिती देण्यासाठी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना गुजरातमध्ये बोलवावे लागले, असा उपरोधिक टोमणा कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारला. भाजपचा विजय विकासामुळे झाला असल्याचा मोदींचा दावा चुकीचा असल्याचेही ते म्हणाले.
 
गुजरातच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे प्रभारी सचिव म्हणून काम पाहणारे खासदार राजीव सातव यांनी गुजरातमध्ये झालेल्या भाजपच्या विजयाचे पोस्टमार्टम केले. गुजरातमध्ये भाजपचा विजय झाला ही बाब कॉंग्रेसला नम्रपणे मान्य आहे. परंतु, भाजपचा विजय विकासामुळे झाला ही बाब चुकीची आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात मोदी यांनी एकदाही विकास, भ्रष्टाचार, काळा पैसा या मुद्यांचा उल्लेख केला नाही. उलट, मोदी यांनी ही निवडणूक स्वत:च्या अस्मितेशी जोडण्याचा प्रयत्न केला. “गुजरात का बेटा’ सांगून पंतप्रधानांनी या निवडणुकीला भावनात्मक बनविण्याचा प्रयत्न केला आणि यात ते यशस्वी सुध्दा झाले, असे सातव म्हणाले.
 
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गाधी यांनी निवडणुकीच्या काळात 13 प्रश्न विचारले होते. भाजपने एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. परंतु, आता निवडणूक झाली आहे. भाजपला सत्ता मिळाली आहे. किमान आता तरी भाजपने राहुल गांधी यांच्या प्रश्नाची उत्तरे द्यावी, अशी मागणी सातव यांनी केली. भाजपने आता नोकरी, शिक्षण, शेतकरी, कृषी, महिला आदी मुद्यावर सरकारने केलेल्या कामाची माहिती सरकारला द्यावी.
 
दरम्यान, गुजरातमध्ये लोकसभेच्या सर्व 26 जागांवर भाजप विजयी झाली आहे. आगामी निवडणूक दीड वर्षांवर येवून ठेपली आहे. मात्र, कॉंग्रेस आतापासून लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागणार असल्याचे सातव यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती