बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे राज्यातील पूरस्थिती गंभीर बनली असून राज्यातील एकूण सुमारे 73 लाख लोकांना पुराचा तडाखा बसल्याचा अंदाज आहे. हजारो लोकांना उघड्यावर आश्रय घ्यायला लागला असून या सर्वांपर्यंत सरकारची मदत पोहचू शकलेली नाही. एकूण 14 जिल्ह्यात गंभीर पुरस्थिती उद्भवली आहे. सीमांचल, मिथीलांचल आणि कोसी या भागाला सर्वाधिक झळ पोहचली आहे. सुमारे शंभरावर लोक या पुरात दगावले असले तरी सरकारच अधिकृत आकडा मात्र 73 मृत इतकाच आहे. अनेक गावे जलमय झाली असून अद्याप तेथे कोणतीही सरकारी मदत पोहचलेली नाही असे अनेक गावकऱ्यांनी सांगितले. आम्ही केवळ देवदयेवर तगून आहोत असे अनेक गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान सरकारी सूत्रांनी सांगितले की राज्य सरकारने आत्ता पर्यंत पूरग्रस्तांसाठी 504 मदत छावण्या उभारल्या असून त्यात सुमारे एक लाख लोकांनी आश्रय घेतला आहे. तंबु, प्लॅस्टिक कागद पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण त्याची मोठी टंचाई असून जादाची मदत सामग्री उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे असे या सूत्रांनी सांगितले.