बडोदा: बोट उलटून 12 लहान मुलं आणि दोन शिक्षकांचा मृत्यू

शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (10:37 IST)
बडोदा येथील तलावात लहान मुलांना जलविहाराला घेऊन गेलेली बोट उलटल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत 12 लहान मुलं आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.
 
या बोटीत एकूण 27 जण होते.
 
बडोद्यातील हरणी तलावात विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन जलविहार करत असलेली बोट उलटली, असल्याची माहिती बीबीसी गुजरातीने दिली आहे.
 
बडोद्याचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत म्हणाले की, 'या दुर्घटनेत 12 मुलं आणि दोन शिक्षक अशा एकूण 14 जणांचे मृत्यू झाले आहेत. बचावलेल्या मुलांवर सयाजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
सध्या स्थानिक अग्निशमन दल आणि बचावपथक घटनास्थळी रवाना झाले आणि बचावकार्याला सुरुवात केली. 13 जण रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
नक्की काय घडलं?
स्थानिक आमदार बालकृष्ण शुक्ला हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलं आपल्या शिक्षकांसोबत नौकाविहार करत होती.
 
याआधी, बडोद्याचे पोलीस कमिशनर अनुपम सिंह गहलोत यांनी म्हटलं की, “शक्य तेवढ्या लोकांना बाहेर काढलं आहे. सहा-सात जण अजूनही पाण्यात आहेत.”
 
बडोद्याचे कलेक्टर एबी गोरे यांच्यानुसार, “त्या नावेत 23 मुलं आणि 4 शिक्षक होते. त्यापैकी 11 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. 7 जणांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सहा-सात जण अजूनही पाण्यात आहेत.”
 
स्थानिक बातम्यांनुसार, “बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक भरले होते. ही मुलं त्यांच्या शिक्षकांसोबत शाळेच्या सहलीला आली होती.”
 
असेही आरोप केले जात आहेत की बोटीत बसण्याआधी मुलांना लाईफ जॅकेट नीट घातले नव्हते. त्यामुळे बोट उलटल्यावर मुलांचा मृत्यू झाला.
 
आमदार बालकृष्ण शुक्ला यांनी घटनास्थळी पोचून काय घडलं याची माहिती घेतली. ते म्हणाले, “हे शालेय विद्यार्थी होते. त्यातल्या अनेकांचा इथे मृत्यू झाला आहे.”
 
बोट कशी उलटली?
 
घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या एका पालकाने म्हटलं, “त्या बोटीत 30 मुलं होती. आम्हाला काय घडलं याबदद्ल आधी सांगण्यात आलं नाही, फक्त एवढंच म्हणाले की तुमचं मुल घाबरलं आहे, त्यामुळे आम्ही इथे आलो.”
 
स्टॅंडिंग कमिटीच्या अध्यक्ष शीतल मिस्त्री यांनी म्हटलं की, “सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पण वेगवेगळे आकडे कानावर येत आहेत. आम्ही मुख्य कंत्राटदाराशी बोललो, तो म्हणाला बोटीत 15 मुलं होती. दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली. बोट कलल्याने उलटली.”
 
त्या पुढे म्हणाल्या, “ही गंभीर घटना आहे. कंत्राटदारही पळून गेला आहे. त्यालाही माहीत नव्हतं की बोटीत नक्की किती मुलं होती. अंदाज असा आहे की या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त मुलं असावीत.”
 
पुरेशी लाईफ जॅकेट न देताच मुलांना बोटीत का बसवलं असा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या, “याचा तपास चालू आहे. अजून मी एकही मृतदेह पाहिलेला नाही. पण कंत्राटदाराचं म्हणणं आहे की लाईफ जॅकेट दिले गेले होते.”
 
या घटनेनंतर मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिलं, “घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या निरागस मुलांचा यात मृत्यू झाला आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो.”
 
त्यांनी असंही म्हटलं की बचावकार्य सुरू आहे आणि पीडितांची तातडीने मदत करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
 
Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती