युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास देशातल्या महामार्गाचा विमानांसाठी रन वे म्हणून वापर व्हावा, यासाठी लखनौ-आग्रा महामार्गावर हवाईदलाची लढाऊ विमाने टच डाऊन म्हणजेच लँडिंग करत टेक ऑफ करत आहेत. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी लखनौ-आग्रा हायवेवर एक-एक करुन लँडिंग केलं. वायुदलाची 20 फायटर विमानं, सुखोई 30, हरक्युलस, जॅग्वार, मिराज आणि मिग यांसारख्या लढाऊ विमानांना महामार्गावर लँड होताना पाहणं, ही पर्वणी ठरत आहे.
आधुनिक युद्धशास्त्रात लढाऊ विमानांना लँडिंग ग्राऊंड म्हणून एक्स्प्रेस वे आणि हायवे वापरण्यास तयार केलं जातं. फक्त भारतच नाही, तर पाकनेही 2000 मध्ये अशा प्रकारचं ड्रिल केलं होतं. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, चीन, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या देशांनीही हा युद्धाभ्यास केला आहे. वायुदलाच्या युद्धाभ्यासामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत लखनौ-आग्रा महामार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.