बेरोजगार राहणपेक्षा भजी विकणे चांगले : अमित शहा

मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (11:37 IST)
आम्ही केंद्रात सत्तेत आलो तेव्हा आम्हाला वारसा म्हणून खड्डेच खड्डे मिळाले. त्यामुळे आमचा बराचसा वेळ हे खड्डे बुजविण्यात गेला, अशी टीका करतानाच देशातील तरुण भजी विकून कुटुंब चालवत असेल तर त्यात गैर काय? त्यांची भिकार्‍यांशी तुलना करून थट्टा करणे कितपत योग्य आहे, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अमित शहा यांनी केला.
 
शहा यांचे राज्यसभेतील खासदार म्हणून हे पहिले भाषण होते. पहिल्याच भाषणात त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवत नरेंद्र मोदी सरकारच्या कामाचा मुक्तकंठाने गौरव केला. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर ते बोलत होते. आम्ही सरकारध्ये आलो तेव्हा खूप काम करावे लागले. मागच्या सरकारने निर्माण केलेले खड्डे बुजविण्यात आमचा बराचसा वेळ गेला. त्यामुळे आमचे विश्र्लेषण करताना वेगळ्या दृष्टीने केले पाहिजे, असे शहा यांनी सांगितले. 2013 मधील देशाची स्थिती आठवा. तेव्हा देशाच्या विकासाची गती थांबली होती. देशात महिला सुरक्षित नव्हत्या. देशाचे संरक्षण करणारे जवानही सरकारच्या निर्णय न घेण्याच्या धोरणामुळे काहीच करू शकत नव्हते, अशी टीका शहा यांनी केली.
 
30 वर्षांत सत्तेत पूर्ण बहुमत असलेली गैरकाँग्रेसी सरकारे खूप कमी आली. आमच्या पक्षाला बहुमत मिळाले होते. तरीही आम्ही रालोआ सरकार स्थापन केले. जेव्हा नरेंद्र मोदी यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली तेव्हा त्यांनी हे सरकार गरिबांचे सरकार असेल, हे सरकार महात्मा गांधी आणि दीनदयाळ यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, असे म्हटले होते, असेही शहा म्हणाले.
 
यावेळी शहा यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतला. जनधन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा जे 60 वर्षांत झाले नाही, ते आता कसे होईल, या विचाराने मीही साशंक होतो. पण आज 31 कोटी लोकांचे बँकेत खाते आहे, असेही त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती