अलर्ट जारी: जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो

रविवार, 29 ऑगस्ट 2021 (16:32 IST)
काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवत भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानकडून भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या नेत्यांनी कंधारमध्ये तालिबानी दहशतवाद्यांची भेट घेतल्यानंतर हा इशारा जारी करण्यात आला आहे. या बैठकीमुळे सुरक्षा यंत्रणांना सीमा ओलांडून दहशतवाद्यांच्या हालचाली वाढवण्याबाबत काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या या बैठकीत तालिबानी अतिरेक्यांचा मोठा गट सहभागी झाला होता. या गटाने भारतात दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी तालिबानकडून पाठिंबा मागितला. 
 
 15 ऑगस्ट रोजी तालिबानी अतिरेक्यांनी काबूलवर कब्जा केला आणि येथील लोकशाही सरकार बरखास्त केले. यावेळी अनेक देश आपल्या नागरिकांना येथून बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. लाखो अफगाण नागरिक इतर देशांमध्येही आश्रय घेत आहेत.
 
एका अधिकाऱ्याने सांगितले की, 24 ऑगस्ट रोजी गुप्तचरांच्या माहितीवरून असे दिसून आले की पाकिस्तानमधील दहशतवादी श्रीनगरमध्ये घुसखोरी आणि ग्रेनेड हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत.हे पाहता सर्व एजन्सींना आपापसात समन्वय साधून सतर्क राहण्यास सांगितले आहे.ही माहिती राज्यांच्या सुरक्षा यंत्रणांनाही देण्यात आली आहे.
 
गेल्या काही आठवड्यांत विविध दहशतवादी संघटनांचे अनेक प्रमुख नेते मारले गेले आहेत. चकमकीत दहशतवादी अब्बास आणि त्याचा साथीदार साकीब ठार झाल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. सध्या खोऱ्यातील परिस्थिती शांत आहे. 
 
अफगाणिस्तानात तालिबानचा ताबा मिळाल्यानंतर जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादाचा धोकाही वाढला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या 38 दहशतवाद्यांनी तालिबानी दहशतवाद्यांकडून प्रशिक्षण घेतल्याची माहिती मिळाली आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करण्याबरोबरच,माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतलेले हे भयानक दहशतवादी आठवड्यापूर्वी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) च्या हजीरा येथे स्थित जैशच्या प्रशिक्षण शिबिरात पोहोचले आहेत. पुंछच्या चक्कन दा बागेसमोर हजीरा कॅम्पमध्ये हालचाली तीव्र करण्याच्या सूचनाही मिळाल्या आहेत. पुंछचा परिसर सीमापार दहशतवादासाठी अत्यंत संवेदनशील आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटली, हजीरा, बाग आणि इतर काही भागात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण शिबिर येथे सुरू आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती