लहान वयात मुलांची लग्ने झाल्याने त्यांच्या आरोग्यावर, मानसिक विकासावर आणि आनंदी जीवनावर परिणाम होतो. लहान वयात लग्न केल्याने संपूर्ण समाजात मागासलेपणा येतो. जी शेवटी समाजाच्या प्रगतीत अडथळा ठरते. कायद्यात लग्नाचे वयही निश्चित करण्यात आले आहे.
मात्र तरी देखील ग्रामीण भागात अद्यापही बाल विवाह होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे प्रशासन वेळोवेळी जनजागृती करत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील जनता मात्र प्रशासनाच्या जनजागृतीला केराच्या टोपल्या दाखवत असल्याचे प्रकार घडत आहेत. अशातच नाशिकसह जिल्ह्यात मागील महिनाभरात जवळपास 13 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. शहरातील पालकांसह ग्रामीण भागातील बहुतांश पालक वर्ग सुशिक्षित असून मात्र गरिबी, हालाखीची परिस्थिती यामुळे लहान वयातच मुलींची लग्न लावून दिली जातात.
बालविवाहासारख्या वाईट प्रथेला गरिबी हे देखील कारण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी बालविवाह होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र असे बालविवाह होऊ नये, यासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. असं असूनही असे बालविवाह होत असल्याचे चित्र वारंवार अधोरेखित होत आहेत.
नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी बालविवाह रोखण्यात आले होते. अशातच मागील महिनाभराची आकडेवारी पाहिली असता महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या बालविवाह प्रतिबंधात्मक धडक मोहिमेअंतर्गत 1 एप्रिल ते 2 मे दरम्यान नाशिक जिल्ह्यात तब्बल 13 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने बालविवाह प्रतिबंधात्मक धडक मोहीम राबविण्यात येते. मागील वर्षभरात जिल्ह्यातील अनेक भागांत जाऊन पथकाने बालविवाह रोखले आहेत. तर याच पथकाने 1 एप्रिल ते 2 मे दरम्यान नाशिक जिल्ह्यात तब्बल 13 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांनी बालविवाह प्रतिबंधक विशेष मोहीम राबवत महीला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, कारवाई करत महिला आणि बालकल्याण विभागाने जिल्ह्यात 13 बालविवाह रोखले. यामध्ये नाशिक तालुक्यातील 1, सिन्नर 1, बागलाण 2, त्र्यंबकेश्वर 7, इगतपुरी 2 बालविवाह रोखण्यात आले आहेत.