Accident : डिव्हायडरला धडकून कारला आग,होरपळून तिघांचा मृत्यू
रविवार, 17 डिसेंबर 2023 (13:59 IST)
राजस्थानमधील अजमेर शहरातील लोहगल रोडवरील पेट्रोल पंपाजवळ शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वेगवान कार दुभाजकाला आदळल्यानंतर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या अपघातात तीन मित्रांचा जिवंत जळून मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीररित्या भाजले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेत कार डिव्हायडरला धडकल्याने अचानक पेट घेतला. स्थानिक लोकांनी तात्काळ कारमधील तीन जणांना वाचवले मात्र उर्वरित दोघे कारमध्ये जळाले. त्यानंतर रुग्णालयात नेत असताना आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. उर्वरित दोघांवर जवाहरलाल नेहरू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारवाई केली आणि मृतांचे मृतदेह जवाहरलाल नेहरू रुग्णालयाच्या शवागारात ठेवले.
ख्रिश्चनगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी रवींद्र सिंह खेगी यांनी सांगितले की,चौरसियावास येथील सोहेल खान, वैशाली नगर येथील रहिवासी जय सांखला आणि कबीर नगर येथील रहिवासी शक्तीसिंग अशी तीन मृतांची नावे आहेत. लोहाखान येथील रहिवासी कृष्णमुरारी आणि गुर्जर धरती येथील उमेश कुमार अशी भाजलेल्या दोघांची नावे आहेत.
कारमध्ये गॅस किट बसवण्यात आली होती, त्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे सगळे पुष्करला गेले होते. परत येताना अजमेरला हा अपघात झाला. भरधाव वेगाने निघालेली कार अनियंत्रित होऊन डिव्हाइडरला आदळली आणि पेट घेतला. या अपघातात तिघांचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाला.
पुष्कर बायपासवरून येणाऱ्या श्यामसिंग राठोड या तरुणाने हे दृश्य पहिले. यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. तेवढ्यात जवळच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणारे शंभूसिंह चौहान आणि दीपक चौहान हे दोन भाऊ आले. त्यांनी कारची काच फोडून तिघांची सुटका केली. दरम्यान कारचा टायर फुटला. यामुळे दोघे भाऊ घाबरले आणि तेथून पळून गेले. त्या दोघांना गाडीतून बाहेर काढू शकले नाही.
श्याम सिंगने तीन जळालेल्या मित्रांना त्याच्या मित्राच्या गाडीतून जेएलएन हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी एकाला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये गॅस किट बसवण्यात आली होती. मात्र ही आग गॅस किटमुळे लागली की शॉर्ट सर्किटमुळे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.