पाच वर्षात 2 हजाराची नोट बंद होणार

नवी दिल्ली- केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदीच्या निर्णयानंतर पाचशे आणि दोन हजार रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या असताना दोन हजारच्या नोटा पुढच्या पाच वर्षात चलनातून रद्द करण्यात येतील, असा दावा अर्थतज्ज्ञ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वदेशी जागरण मंच चे सहसंयोजक स्वमीनाथम गुरुमूर्ती यांनी केला आहे.
गुरुमूर्ती यांनी नोटाबंदीबाबत एका मुलाखतीत म्हटले की भविष्यात पाचशेची नोटच चलनातील सर्वात मोठी नोट असेल. नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात चलनतुटवडा निर्माण होईल हे ध्यानात घेऊन सरकारने दोन हजाराची नोट चलनात आणली आहे, असेही गुरुमूर्ती यांनी नमूद केले.
 
दरम्यान, काळा पैसा आणि भष्ट्राचारविरोधात कठोर पाऊल म्हणून सरकारने पाचशे आणि एक हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयावर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे. पाचशे आणि एक हजाराच्या नोटांमुळे भष्ट्राचार बोकाळ्याचा दावा करणारे सरकार त्यापेक्षा मोठी दोन हजाराची नोट चलनात कसे आणते?, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. दोन हजाराच्या नोटेमुळे छोट्या ग्राहकांची कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुमूर्ती यांचे विधान फारच महत्त्वाचे मानले जात आहे.

वेबदुनिया वर वाचा